–योगेश पांडे, नागपूर
ADVERTISEMENT
भाजप वर्चस्व असलेल्या नागपूर महानगरपालिका निवडणुसाठी महिलांच्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व सर्वसाधारण प्रवर्गाचे आरक्षण मंगळवारी (31 मे) जाहिर करण्यात आलं.
नागपूर शहरातील रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या प्रमुख उपस्थितीत आरक्षण सोडतीची प्रक्रिया पार पडली.
सहायक आयुक्त महेश धामेचा यांनी शहराची लोकसंख्या, थेट महिला आरक्षित जागा आणि प्रभागाची सविस्तर माहिती सादर केली. १२ मे रोजी निवडणूक आयोगाद्वारे प्रभाग रचनेचे अंतिम प्रारूप मंजुर करण्यात आलं.
२०११ च्या जनगणनेनुसार नागपूर शहराची लोकसंख्या २४,४७,४९४ एवढी आहे. यापैकी अनुसूचित जातीची लोकसंख्या ४,८०,७५९, तर अनुसूचित जमाती लोकसंख्या १,८८,४४४ इतकी आहे.
नागपूर शहराची ५२ प्रभागांमध्ये विभागणी करण्यात आली असून, त्रिस्तरीय प्रभागरचना करण्यात आली आहे. त्यानुसार एकूण सदस्य संख्या १५६ असणार आहे.
यापैकी ५० टक्के अर्थात ७८ जागा महिलांसाठी राखीव असणार आहे. राज्य निवडणूक आयोगाद्वारे सर्वसाधारण महिलांकरिता ४४ जागा थेट नेमून दिलेल्या आहेत.
अनुसूचित जाती प्रर्वगासाठी करिता एकूण ३१ जागा आरक्षित असून, त्यातील १६ जागा महिलांसाठी राखीव आहेत. अनुसूचित जमाती करिता १२ जागा राखीव असून, त्यापैकी ६ जागा महिलांकरिता राखीव आहे. त्यांची सोडत मंगळवारी काढण्यात आली.
अनुसूचित जातीसाठी आरक्षित ३१ प्रभागाच्या चिठ्ठ्यांमधून महिलांच्या १६ जागा काढण्यात आल्या. यामध्ये प्रभाग क्रमांक १ अ, २ अ, १० अ, १३ अ, १४ अ, १५ अ, १६ अ, २० अ, २७ अ, ३० अ, ३७ अ, ३८ अ, ३९ अ, ४३ अ, ४५ अ आणि ५२ अ असे अनुसूचित जाती महिलांचे प्रभाग आरक्षण निश्चित करण्यात आले आहेत.
अनुसूचित जमातीसाठी प्रभाग क्रमांक ४ ब, १२ ब आणि ५१ ब या तीन प्रभागांची थेट निश्चित करण्यात आले. यानंतर उर्वरित ३ जागांसाठी अनुसूचित जमातीच्या उर्वरीत ९ जागामधुन ३ चिठ्ठ्या काढण्यात आल्या. यामध्ये प्रभाग क्रमांक २४ अ, ११ अ आणि ३७ ब चे अनुसूचित जाती महिला प्रवर्गाचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.
महिलांच्या सर्वसाधारण प्रवर्गासाठी एकूण १७ चिठ्ठ्या टाकण्यात आल्या. यापैकी १२ चिठ्ठ्या काढून त्यातून सर्वसाधारण माहितीकरीता १२ जागांचे आरक्षण जाहीर करण्यात आले. यामध्ये प्रभाग क्रमांक ६ ब, १७ अ, २२ ब, २३ ब, २९ ब, ३१ ब, ३२ ब, ३५ ब, ४० ब, ४२ ब, ४८ ब आणि ४९ ब या १२ प्रभागांचे सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षण निश्चित करण्यात आले आहेत.
१ ते ६ जूनपर्यंत नोंदवता येणार हरकती
मंगळवारी महिलांच्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि सर्वसाधारण प्रवर्गाचे आरक्षण जाहीर झाले. या आरक्षणाचे प्रारुप बुधवार १ जून रोजी प्रसिद्ध केले जाणार आहे.
आरक्षणाबाबत नागरिकांच्या हरकती व सूचना असल्यास त्या १ ते ६ जून या कालावधीत दुपारी ३ वाजतापर्यंत महानगरपालिका आयुक्तांकडे निवडणूक कार्यालय किंवा संबंधित प्रभाग कार्यालयाच्या मुख्यालयात सादर करता येणार आहे.
प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी नागरिकांना तसे आवाहन केलं आहे. आरक्षणाबाबत अंतिम अधिसूचना १३ जून रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे.
ADVERTISEMENT