महाजेनकोत आर्थिक घोटाळ्याचा आरोप, नितीन राऊतांच्या खात्यावर नाना पटोलेंची नाव न घेता टीका

मुंबई तक

• 05:28 AM • 02 Jul 2021

राज्यात सत्तेत आल्यापासून महाविकास आघाडी सरकारला अंतर्गत कलहाचा फटका बसताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग, शिवसेना आमदार प्रताप सरनाईक, माजी मंत्री विजय शिवतारे यांच्या लेटरबॉम्बमुळे राज्याचं राजकारण ढळवून निघालं होतं. यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाजेनकोत आर्थिक घोटाळ्याचा आरोप करत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून […]

Mumbaitak
follow google news

राज्यात सत्तेत आल्यापासून महाविकास आघाडी सरकारला अंतर्गत कलहाचा फटका बसताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग, शिवसेना आमदार प्रताप सरनाईक, माजी मंत्री विजय शिवतारे यांच्या लेटरबॉम्बमुळे राज्याचं राजकारण ढळवून निघालं होतं. यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाजेनकोत आर्थिक घोटाळ्याचा आरोप करत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीलं आहे.

हे वाचलं का?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून नाना पटोले यांनी महाजेनकोमधील आर्थिक घोळ, पदाचा दुरुपयोग आणि महाराष्ट्राच्या वीज उत्पादनावर याचा होत असलेला परिणाम याबद्दल लिहून चौकशीची मागणी केली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे हे खातं काँग्रेसच्या नितीन राऊतांकडे असल्यामुळे महाविकास आघाडीमधला अंतर्गत वाद पुन्हा एकदा प्रामुख्याने समोर आला आहे.

आपल्या पत्रात नाना पटोले यांनी महाजेनको म्हणजेच राज्याच्या वीजनिर्मिती कंपनीत कोळसा पुरवठा आणि कोळसा वॉशिंगच्या निवीदा प्रक्रियेत घोळ, गैरमार्गाचा वापर आणि अनधिकृतपणे पदाचा वापर करुन काम देण्यात आल्याचा ठपका ठेवला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी महाजेनकोने दिलेल्या कामाच्या अंतिम आदेशाला स्थगिती देण्याची विनंती नाना पटोलेंनी केली आहे. या निवीदा प्रक्रियेची चौकशी करण्यात यावी अशी मागणी नाना पटोलेंनी केली आहे.

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जाहीर झाल्यानंतर भाजपची रणनीती समोर येईल- फडणवीस

रखुमाई इन्फ्रावर नाना पटोलेंनी कोणते गंभीर आरोप केले आहेत?

  • या कंपनीचं कुठलही नेटवर्थ नाही

  • या कंपनीचा कोणताही टर्नओव्हर नाही

  • या कंपनीला सिक्युरिटी क्लिअरन्स नाही

  • या कंपनीला कोळसा वॉशिंगचा कोणताही अनुभव नाही

  • अटी व शर्ती पूर्ण केलेल्या नसतानाही गैरमार्गाने या कंपनीला कामासाठी पात्र ठरवण्यात आलंय.

  • ही कंपनी महाजेनकोला वेळेवर कोळसा पुरवठा करु शकणार नाही.

  • याचा परिणाम राज्याच्या वीज उत्पादनावर होऊ शकतो

रखुमाई इन्फ्रा ही कंपनी संजय हरदवाणी यांच्या मालकीची आहे. या कंपनीवर आरोप करताना नाना पटोलेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासह संबंधित खनिज महामंडळाच्या सचिवांनाही या पत्राची प्रत पाठवली आहे. परंतू ज्या खात्यासाठी या निवीदा घेण्यात आल्या त्या उर्जा खात्याला या पत्राची प्रत देण्यात आलेली नाहीये. संजय हरदवाणी हे नितीन राऊत यांच्या जवळचे मानले जातात. त्यामुळे महाजेनकोत घोटाळा झाल्याचा आरोप करत नाना पटोले नितीन राऊतांवर निशाणा साधू पाहत असल्याचं बोललं जात आहे.

नाना पटोले आणि नितीन राऊत यांच्यातल समीकरण गेल्या काही दिवसांपासून बिघडलेलं आहे. बाळासाहेब थोरातांनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी राऊत आणि पटोले दोघेही इच्छुक होते. यासाठी दोघांनीही दिल्ली वाऱ्या केल्या. परंतू दिल्लीने प्रदेशाध्यक्ष पदाची माळ नाना पटोलेंच्या गळ्यात घातली. दरम्यानच्या काळात नाना पटोलेंनी नितीन राऊतांचं उर्जा खातं आपल्याला मिळून विधानसभा अध्यक्षपदासाठी नितीन राऊतांना संधी मिळावी यासाठी दिल्ली दरबारी प्रयत्न केले. ज्याला नितीन राऊतांचा विरोध असून ते नाराज असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे या पत्राच्या आडून नाना पटोले नितीन राऊतांच्या उर्जा खात्याचा पदभार मिळावा यासाठी प्रयत्न करत असल्याचं बोललं जातंय.

    follow whatsapp