नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक नारायण दाभाडकर यांनी स्वतःला कोरोना झालेला असतानाही आपला ऑक्सिजन बेड गरजू रुग्णासाठी दिल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये येत आहेत. वयाच्या ८५ व्या वर्षी नारायण दाभाडकर यांनी केलेल्या त्यागाचं सर्वस्तरातून कौतुक होत असताना काही जणांनी या घटनेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलंय. या घटनेवरुन तयार झालेल्या संभ्रमाबद्दल दाभाडकर यांची मुलगी आसावरी कोठीवान यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे.
ADVERTISEMENT
…किर्तीरुपी उरावे ! माझं जगून झालंय म्हणत संघ स्वयंसेवकाने ऑक्सिजन बेड गरजूसाठी केला रिकामा
आपल्या वडीलांनी केलेल्या त्यागाबद्दल सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांमध्ये अनेक बातम्या येत आहेत. त्यावर आपल्याला बोलायचं आहे असं म्हणून आसावरी यांनी एका व्हिडीओ मेसेज द्वारे आपली बाजू मांडली आहे. “२१ एप्रिल रोजी माझ्या वडिलांना नागपूरच्या इंदिरा गांधी रुग्णालयात मोठ्या प्रयत्नांनी बेड मिळाला होता. आमचं संपूर्ण कुटुंब कोरोनाशी लढत असताना बाबांची तब्येत खराब झाल्यामुळे त्यांना आम्ही रुग्णालयात भरती करण्याचं ठरवलं. घरात माझे सासरेही अंथरुणाला खिळून असल्यामुळे मी अँब्यूलन्स मागवून नातेवाईकांतर्फे बाबांना रुग्णालयात भरती केलं. रुग्णालयात पोहचल्यानंतर सर्व सोपस्कार पार पडल्यानंतर बाबांना ऑक्सिजन लावण्यात आला.”
बाबांची ऑक्सिजन पातळी ही ५०-५५ च्या घरात होती, त्यातच त्यांना इन्फेक्शन झाल्यामुळे डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरु केले. मात्र यावेळी कॉरिडोरमध्ये रुग्णांचे विव्हळण्याचे, बेड साठी याचना करतानाचे आवाज बाबांना यायला लागले. ते आवाज ऐकून त्यांनी घरी जाण्याचा निर्णय घेतला. बाबांनी मला फोन करुन मला घरी यायचं आहे, माझं वय आता ८५ वर्ष झालं आहे. मी माझं आयुष्य जगलो असून इथल्या ४० वर्षाच्या रुग्णाला बेडची जास्त गरज असल्याचं बाबांनी मला फोनवरुन सांगितल्याचं आसावरी यांनी स्पष्ट केलं.
बाबांची तब्येत खराब असल्यामुळे आम्ही आणि डॉक्टरांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. आता बेड सोडला तर पुन्हा बेड मिळणं शक्य होणार नाही हे देखील आम्ही बाबांना सांगितलं. परंतू त्यांनी हॉस्पिटलमध्ये रहायचं नाही हे ठरवलं होतं आणि त्यांनी मला घरी घेऊन चला असं सांगितलं. अखेरीस आम्ही त्यांना घरी आणलं. यानंतर पुढचे दीड दिवस ते आमच्यासोबत होते नंतर त्यांची प्राणज्योत मालवली. बाबा हॉस्पिटलमधून निघून आल्यानंतर तो बेड कोणाला मिळाला, ज्या रुग्णाला त्याची गरज होती त्याची तब्येत याविषयी आम्हाला माहिती नाही. पण, माझ्या बाबांनी केलेल्या त्यागाचं आम्हाला भांडवलं करायचं नाही, असं म्हणत असताना आसावरी भावूक झाल्या. त्यामुळे दाभाडकर यांच्या मुलीने स्पष्टीकरण दिल्यानंतर या प्रकरणातल्या चर्चा थांबतील का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT