नाशिक (प्रविण ठाकरे) : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मोठी दुर्घटना घडली आहे. नाशिक येथील इगतपुरी तालुक्यातील मुंडेगाव जवळील जिंदाल कंपनीत रविवारी सकाळी एक स्फोट झाला. यात १४ कर्मचारी जखमी झाले असून त्यापैकी ११ जणांवर सुयश या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यातील दोन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. स्फोटामुळे कंपनीही आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने मोठं नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
ADVERTISEMENT
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कंपनीतील बॉयलर फुटल्याने लाग लागली आहे. या घटनेची माहिती मिळताच शहापूर, इगतपुरी, नाशिक महापालिका, एमआयडीसी, नॅशनल हायवे यांची अग्निशामक दलाचे जवान आणि बंब घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही घटनेचा आढावा घेण्यासाठी नाशिकला रवाना झाल्याची माहिती मिळत आहे.
घटनेची अधिक माहिती अशी की, नाशिकमध्ये जिंदाल ग्रुपची पोलिफिल्मची निर्मिती करणारी कंपनी आहे. याच कंपनीत बॉयलर फुटल्यामुळे आधी स्फोट झाला आणि या स्फोटमुळे आग लागली. या आगीमध्ये १४ कर्मचारी गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली होती. तर काही कर्मचारी आत अडकल्याचीही समोर आली. आगीचे लोण दूरवर पसरल्याचं दिसत आहे.
दरम्यान, घटनास्थळावर बचाव कार्य सुरू असून परिसरात या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. तर भीषण आगीमुळे अद्यापही छोटे-छोटे स्फोट होत असल्याने परिसरात मोठा प्रमाणात घबराटीचे वातावरण निर्माण झालेले आहे. नाशिक येथील भीषण दुर्घटनेमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही तातडीने नाशिकला रवाना झाले असल्याची माहिती मिळत आहे. ते घटनास्थळाला भेट देणार असल्याची माहिती आहे. तसंच जखमींचीही भेट घेण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
ADVERTISEMENT