कॉर्डेलिया क्रूझ जहाजावरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी विविध शंका आणि प्रश्न उपस्थित करत राष्ट्रवादीचे नेते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मुंबई एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मलिक यांनी मंगळवारी पुन्हा एकदा व्हॉट्सअॅप चॅट काही स्क्रीनशॉट शेअर करत समीर वानखेडेंवर निशाणा साधला आहे.
ADVERTISEMENT
एनसीबीने कारवाई केलेल्या ड्रग्ज पार्टी प्रकरणात नवाब मलिक हे सुरुवातीपासूनच समीर वानखेडे यांच्या भूमिकेबद्दल शंका उपस्थित करताना दिसत आहे. समीर वानखेडे हे त्यांच्या खाजगी लोकांच्या मदतीने बनावट कारवाया करत असल्याचंही मलिक यांनी म्हटलेलं आहे. त्यानंतर आज (16 नोव्हेंबर) नवाब मलिक यांनी काही व्हॉट्सअॅप चॅट सार्वजनिक करत खळबळ उडवून दिली.
नवाब मलिक Vs समीर वानखेडे: काय आहेत आरोप-प्रत्यारोप? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण!
ड्रग्ज पार्टी प्रकरणातील एनसीबीचा साक्षीदार आणि सध्या येरवडा तुरुंगात असलेल्या किरण गोसावी आणि खबऱ्यामधील व्हॉट्सअॅप चॅटचे स्क्रीनशॉट ट्वीट केले आहेत. ज्यात खबरी आणि गोसावी एकमेकांशी व्यक्तींच्या ओळखीबद्दल बोलताना दिसत आहे.
‘किरण गोसावी आणि खबरी यांच्यातील व्हॉट्सअॅप चॅटमधून दिसून येतंय की, कॉर्डेलिया क्रूझवरील पार्टीत सहभागी होणाऱ्या लोकांना जाळ्यात अडकवण्याची योजना ते कशा पद्धतीने आखत होते. ही समीर दाऊद वानखेडेंची खासगी आर्मी आहे, त्याच्यामुळे त्यांच्याकडे सांगण्यासारखं बरंच काही आहे’, असंही मलिकांनी हे स्क्रीनशॉट ट्वीट करताना म्हटलं आहे.
ड्रग्ज पेडलर्सना अभय, कलाकरांकडून खंडणी! समीर वानखेडेंनी मुंबई शहर ‘पाताल लोक’ बनवलं-नवाब मलिक
याचबरोबरच नवाब मलिक यांनी आणखी एक ट्वीट केलं आहे, जे काशिफ खान संदर्भातील आहे. ‘किरण गोसावी आणि खबरी यांच्यातील हे चॅट आहे, ज्यात काशिफ खानचा उल्लेख केलेला आहे. मग काशिफ खानची चौकशी का केली जात नाहीये? काशिफ खान आणि समीर दाऊद वानखेडे यांच्यामध्ये कोणते संबंध आहेत?’, असा सवालही मलिक यांनी विचारला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या टोमण्यानंतर NCB ची मुंबईबाहेर मोठी कारवाई, नांदेडमध्ये पकडला १.१ टन गांजा
नवाब मलिक यांनीही काही दिवसांपूर्वी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले होते. फडणवीस यांचेही ड्रग्ज पेडलर्सशी संबंध असल्याचा आरोप मलिकांनी केला होता. त्यामुळे समीर वानखेडे यांच्याबद्दलची चर्चा कमी झाली होती. मात्र, मलिक यांनी पुन्हा एकदा आपला मोर्चा समीर वानखेडे यांच्याकडे वळवल्याचं दिसतं आहे.
ADVERTISEMENT