मुंबई: मागील अनेक दिवसांपासून प्रचंड चर्चेत असलेले IRS अधिकारी समीर वानखेडे यांच्याशी संबंधित आता एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB) झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना एनसीबीमध्ये आणखी मुदतवाढ देण्यात आलेली नाही. त्यांना याआधी देण्यात आलेली मुदतवाढ ही 31 डिसेंबर रोजी संपली आहे. समीर वानखेडे हे आयआरएस अधिकारी असून ते मुंबईतील क्रूझ ड्रग्स प्रकरणाच्या तपासामुळे प्रसिद्धीच्या झोतात आले होते. त्यानंतर आर्यन खानच्या अटकेपासून ते सतत चर्चेत राहिले होते. पण याच प्रकरणात त्यांच्यावर प्रचंड टीका देखील करण्यात आली होती.
ADVERTISEMENT
IRS अधिकारी समीर वानखेडे यांची NCB मध्ये 4 महिन्यांची मुदतवाढ 31 डिसेंबर 2021 रोजी पूर्ण झाली आहे. एनसीआरबीमध्ये त्यांच्या पोस्टिंगबद्दल अनेक दिवसांपासून अटकळ होती की त्यांना पुन्हा मुदतवाढ मिळू शकते. पण असं झाले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार समीर वानखेडे यांची आता त्यांच्या मूळ कॅडरला बदली होणार असल्याचं समजतं आहे. त्यांचं मूळ कॅडर म्हणजे जीएसटी आणि सीमा शुल्क इकडे त्यांची पुन्हा बदली होणार आहे. खरं म्हणजे ते IRS अधिकारी असल्याने त्यांना ते याच विभागात कार्यरत होते. मात्र त्यांना NCB मध्ये लोनवर आणण्यात आलं होतं.
कोण आहेत समीर वानखेडे?
समीर वानखेडे हे मूळचे महाराष्ट्रातील असून ते 2008 च्या बॅचचे IRS अधिकारी आहेत. भारतीय महसूल सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उप सीमाशुल्क आयुक्त म्हणून झाली होती. त्यांची येथील तडफदार कामगिरी पाहून त्यांना आधी आंध्र प्रदेश आणि नंतर दिल्लीला पाठवण्यात आलं होतं.
अंमली पदार्थ आणि मादक पदार्थांशी संबंधित बाबींमध्ये ते तज्ज्ञ मानले जातात. गेल्या दोन वर्षांत समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 17 हजार कोटी रुपयांचे ड्रग्स आणि ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश झाला.
DRI मधून NCB मध्ये पोस्टिंग
यानंतर समीर वानखेडेची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली करण्यात आली होती. एनसीबीच्या मुंबई युनिटचे प्रमुख म्हणून समीर वानखेडेंनी बॉलिवूडमध्ये खळबळ उडवून दिली होती. अनेक चित्रपट क्षेत्रातील व्यक्तींची चौकशी करण्यासाठी त्यांना त्यांच्या कार्यालयात बोलावण्यात आले होते.
क्रूझ ड्रग्स प्रकरण
समीर वानखेडे यांनी 2 ऑक्टोबर 2021 रोजी मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझ जहाजावर छापा टाकला होता. यादरम्यान त्यांनी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्यासह 9 जणांना ड्रग्स प्रकरणात अटक केली होती.
मात्र, आर्यनकडे कोणतेही ड्रग्स सापडले नव्हते. या प्रकरणात समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप होऊ लागले. खंडणीसाठी वानखेडे बॉलिवूडमधील कलाकारांना ब्लॅकमेल करत असल्याचे आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. एवढंच नव्हे तर समीर वानखेडे यांनी कोट्यवधी रुपयांची वसुली केल्याचा आरोप देखील त्यांनी त्यांच्यावर केला होता.
या सगळ्या प्रकारानंतर महाराष्ट्र सरकारचे मंत्री नवाब मलिक यांनी त्यांच्याविरोधात आघाडी उघडली होती. नवाब मलिक यांनी समीर वानखेडेविरोधात एक-एक धक्कादायक खुलासे केले होते. त्यामुळे समीर वानखेडे अडचणीत आले होते. समीर वानखेडे यांच्यावर होणारे आरोप पाहता आर्यन खान प्रकरण समीर वानखेडे यांच्याकडून काढून घेण्यात आला होता आणि आता त्यांना एनसीबीमधून देखील कार्यमुक्त करण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT