राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना 3 मार्च पर्यंत ईडी कोठडीत धाडण्यात आलं आहे. नवाब मलिक यांच्या घरी पहाटे साडेचारलाच ईडीचे अधिकारी गेले होते. त्यानंतर त्यांना ईडी कार्यालयात आणण्यात आलं. तिथे त्यांची आठ तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर मेडिकल चाचणी करून त्यांना अटक कऱण्यात आली. कोर्टात ईडीने त्यांची चौदा दिवसांची कोठडी मागितली होती. त्यानंतर नवाब मलिक यांच्या वकिलांनी जोरदार युक्तिवादही केला. ईडी आणि नवाब मलिक यांचे वकील यांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टाने हा निर्णय दिला आहे.
ADVERTISEMENT
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे. मागच्या काही तासांपासून त्यांची चौकशी सुरू करण्यात आली होती. आता अखेर त्यांना अटक केली आहे. नवाब मलिक यांनी 1993 स्फोटातील आरोपीकडून कुर्ला भागात एक मालमत्ता खरेदी केली होती. कोट्यवधींची किंमत असलेली ही मालमत्ता नवाब मलिकांनी अवघ्या 30 लाखांत खरेदी केली होती. असा आरोप विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी 9 नोव्हेंबर 2021 रोजी घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत केला होता. या जमीन खरेदीत मोठा घोटाळा झाला असल्याचा आरोप करण्यात आला होता. याच प्रकरणी चौकशी केल्यानंतर आता नवाब मलिक यांना अटक करण्यात आली आहे.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या एका प्रकरणाचा तपास सुरु असताना मलिक यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणातच आज मलिक यांना अटक करण्यात आली आहे. या नंतर राज्यातील राजकारणात मोठी खळबळ माजल्याचं पाहायला मिळतंय. सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजप नेत्यांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मलिकांच्या राजीनाम्याची मागणी केलीय. तर भाजप आमदार आशिष शेलार यांनी ‘नवाब बेनकाब हो गया’ असा जोरदार टोला लगावलाय.
‘नवाब बेनकाब हो गया! गुन्हेगार समर्थक ठाकरे सरकार का पर्दाफाश हो गया!’, असं ट्वीट करत आशिष शेलार यांनी मलिकांवर निशाणा साधलाय. इतकंच नाही तर ‘आरोपी आणि संशयित लोकांच्या वतीने उत्तर देता येत नाहीत, त्यावेळी काही राजकीय पक्ष विशेषत: महाविकास आघाडीतील सत्ताधारी, तपास यंत्रणांच्या कारवाई आड लपून भाजपा हल्ला करतात, अशा हल्ल्याला आम्ही घाबरत नाही’, असंही शेलार यांनी म्हटलंय.
ADVERTISEMENT