(Anil Deshmukh latest News)
ADVERTISEMENT
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन स्थगितीला मुंबई उच्च न्यायालयाने मुदतवाढ देण्यास नकार दिल्यानंतर उद्या (बुधवारी) ते आर्थर रोड तुरुंगातून बाहेर येणार आहेत. त्यांचे वकील अनिकेत निकम आणि इंद्रपाल सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी ३.०० वाजेपर्यंत जामिनाची प्रक्रिया पूर्ण होऊन ते कारागृहातून बाहेर येतील.
हिवाळी अधिवेशनाला मुकणार!
अनिल देशमुख उद्या बाहेर येणार असल्याने नागपूरमध्ये सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाला ते जाणार का? असा सवाल विचारला जात आहे. मात्र न्यायालयाने जमीन देताना टाकलेल्या एका अटीमुळे ते हिवाळी अधिवेशनाला मुकणार आहेत. देशमुखांना जामीन देताना त्यांना मुंबईबाहेर जाण्यास मनाई केली आहे. त्यामुळे त्यांना जामीन मिळाल्यानंतरही अधिवशेनाला जाता येणार नाही.
अखेर जामीन मंजूर :
उच्च न्यायालयाने यापूर्वी ११ डिसेंबरला देशमुख यांना सीबीआय खटल्यात जामीन मंजूर केला होता. मात्र, सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याची भूमिका घेत जामीनाला १० दिवस स्थगिती देण्याची मागणी केली होती. त्यामुळे न्यायालयाने २१ डिसेंबरपर्यंत जामिनाला स्थगिती दिली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाला नाताळची सुट्टी असल्याने सीबीआयच्या विनंतीवरुन स्थगितीची मुदत २७ डिसेंबर पर्यंत वाढविली होती.
त्यानंतर आजच्या सुनावणीत न्यायालयाने देशमुख यांच्या जामीनावरील स्थगिती वाढविण्यास न्यायालयाने नकार दिला. तातडीची सुनावणी घेण्यास सुट्टीमुळे अडचणी येत असल्याने सीबीआयने आज पुन्हा स्थगितीची मुदत वाढविण्याची मागणी केली होती. ही न्यायालायने फेटाळून लावली. त्यामुळे अखेर देशमुख यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. काही दिवसांपूर्वी देशमुख यांना ईडीच्या खटल्यातही जामीन मिळाला आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचार केल्याचे आरोप केलेले आहेत. याप्रकरणात उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर ईडीचाही ससेमिरा देशमुख यांच्या मागे लागला होता. या दोन्ही यंत्रणांनी देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली होती. अखेर आता या दोन्ही प्रकरणांमध्ये ईडीने देशमुख यांना जामीन मंजूर केला आहे.
ADVERTISEMENT