पंढरपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याण काळे यांनी नुकतीच मंत्री तानाजी सावंत यांची भेट घेतली होती. त्यामुळे कल्याण काळे दोन वर्षांमध्ये पुन्हा पक्षांतर करणार का? असा सवाल विचारण्यात येत होता. मात्र सावंत यांनी काळे यांना दिल्या घरी सुखी राहा असा जाहीर सल्ला देत या चर्चांना पूर्णविराम दिला.
ADVERTISEMENT
मागील आठवड्यात आरोग्य मंत्री तानाजी सावंत सोलापूरच्या दौऱ्यावर होते. या दरम्यान सावंत पंढरपूरमध्ये आले असताना कल्याण काळे यांनी त्यांची भेट घेतली होती. त्यावेळी माळशिरसचे भाजप आमदार राम सातपुते, माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी सावंत व इतर नेतेमंडळी उपस्थित होती. काळे-सावंत आणि इतर भाजप नेत्यांच्या भेटीगाठीनंतर पंढरपूर-मंगळेवढा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या तोंडावर भाजपतून राष्ट्रवादीत गेलेले काळे पुन्हा पक्षांतर करणार का अशी चर्चा पंढरपुरात रंगली होती.
त्यानंतर सावंत यांचा सत्कार करतेवेळी कोणी तरी सहज विचारले, “चेअरमन साहेब प्रवेश का?” या प्रश्नानंतर मंत्री सावंत यांनाच राहवलं नाही आणि ते म्हणाले “लोक तुम्हाला वेड्यात काढतील चेअरमन साहेब. किती वेळा किती ठिकाणी गेले. राहू द्या, दिल्या घरी सुखी रहा” म्हणत मिश्किल टिप्पणी केली, अन् एकाच हशा पिकला.
कल्याण काळे हे पूर्वी काँग्रेसमध्ये होते. त्यानंतर शिवसेनेत गेले. तिथून ते भारतीय जनता पक्षात गेले. पण महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर स्थानिक राजकारण आणि कारखान्याच्या काही प्रश्नांमुळे त्यांनी पंढरपूर पोटनिवडणुकीच्या तोंडावर तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर आता अवघ्या दोन वर्षांत ते आपल्या राजकीय कारकीर्दीमधील पाचवे सत्तांतर करणार अशा चर्चांना सुरुवात झाली होती. मात्र सावंत यांनी या चर्चांना जाहीर सल्ला देवूनच पूर्णविराम दिला.
ADVERTISEMENT