मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी काल (10 नोव्हेंबर) विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस अत्यंत खळबळजनक आरोप केले होते. याच आरोपानंतर प्रत्युत्तर देताना फडणवीसांनी एक ट्विट केलं होतं. ज्यामध्ये असं म्हटलं होतं की, ‘डुकरासोबत कुस्ती करून घाण अंगाला लावून घ्यायची नाही.’ आता त्यांच्या या टीकेवर नवाब मलिकांनी हल्लाबोल केला आहे.
ADVERTISEMENT
‘माणूस हा माणूस असतो… त्याला जनावरांची उपमा देण्याची संस्कृती भाजपची आहे आणि तेच देवेंद्र फडणवीस यांनी दाखवून दिलं आहे.’ अशा शब्दात मलिकांना फडणवीसांवर पलटवार केला आहे.
सर्वात आधी जाणून घेऊयात नवाब मलिकांना फडणवीसांच्या ‘त्या’ ट्विटबाबत काय म्हटलंय
‘देवेंद्र फडणवीस यांनी बर्नार्ड शॉच्या एका म्हणीचा उल्लेख करुन माझ्या बाबतीत एका जनावराची उपमा देण्याचा प्रयत्न केला आहे. मी बोलू इच्छितो की, भाजपचे नेते सगळ्यांना कुत्रा, मांजर, साप, विंचू, डुक्कर हे बोलत राहतात. याच्यातून यांची काय संस्कृती आहे हे दिसून येते.’
‘माणसाला माणूस समजत नाहीत. लोकांना जनावरांची उपाधी देणं ही यांची संस्कृती आहे आणि या उपाधीमुळे आमची काही इज्जत जात नाही.’ असं म्हणत नवाब मलिक यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे.
देवेंद्र फडणवीसांनी नेमकं काय ट्विट केलं होतं?
देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं हे ट्विट म्हणजे जगप्रसिद्ध इंग्रजी लेखक जॉर्ज बर्नाड शॉ यांच्या पुस्तकातील एक कोट आहे. ‘मी फार आधीच शिकलोय की, डुकराशी कुस्ती खेळायची नसते. अशी कुस्ती खेळून तुम्ही स्वतः तर घाणीने माखून जाताच, पण यात डुकरालाच मजा येत असते.’
नवाब मलिकांनी काल (10 नोव्हेंबर) जी पत्रकार परिषद घेतली त्यानंतर फडणवीसांनी हे ट्वीट केलं होतं. फडणवीस यांचं हे ट्विट म्हणजे नवाब मलिकांना दिलेलं उत्तर होतं. स्वत: फडणवीसांनी नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना म्हटलं होतं की, ‘नवाब मलिकांच्या आरोपाला माझं ट्विट पुरेसं आहे. तेवढंच त्यांचं वजन आहे.’
मलिकांच्या इशाऱ्यांनंतर फडणवीसांच्या ट्विटची चर्चा; म्हणाले, डुकराशी कुस्ती…
मलिकांनी काय केले होते आरोप?
नवाब मलिक यांनी 10 नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषद घेऊन देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले होते. फडणवीसांच्या संरक्षणात राज्यात बनावट नोटांचं रॅकेट चालवण्यात आल्याचा दावा मलिकांनी केला होता. तसंच मुन्ना यादव, रियाज भाटी, हाजी अराफत यांची नाव घेत फडणवीसांवर हल्लाबोल चढवला होता. याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं ट्विट मलिकांना प्रत्युत्तर असल्याचं मानलं जात आहे.
ADVERTISEMENT