मंगळवारी राज्यसभेत काँग्रेसचे राज्यसभा खासदार गुलाम नबी आझाद यांचा कार्यकाळ संपला. आझाद यांना निरोप देताना सर्वपक्षीय नेत्यांनी आपलं मनोगत व्यक्त करत त्यांच्या कार्याचा गौरव केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आझाद यांचा उल्लेख खरा मित्र असं केला. एका प्रसंगाबद्दल आठवण करुन देत असताना मोदी राज्यसभेत भावूक झालेले पहायला मिळाले.
ADVERTISEMENT
यानंतर दिवसभर मीडियात मोदींच्या या भावूक रुपाची चर्चा सुरु होती. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनाही मोदींचं हे रुप पाहून आनंद झाला. आपल्या अकाऊंटवरुन ट्विट करत रोहित पवारांनी मोदींचं कौतुक केलंय.
पक्षीय मतभेद जरुर असावेत पण मनभेद नसावेत…भारतीय राजकारणाऱ्यांनी आखून दिलेल्या मार्गावर मोदी चालत असल्याचं पाहून आनंद वाटला असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
यावेळी राज्यसभेत बोलत असताना गुलाम नबी आझाद यांचा उल्लेख खरा मित्र असं करताना नरेंद्र मोदी यांनी, आझाद यांनी खासदार आणि विरोधी पक्षनेता म्हणून नेहमी आपलं वेगळेपण सिद्ध केल्याचं म्हटलं. सत्ता येते, मोठी पदं मिळतात, सत्ता हातातून जाते या सर्व गोष्टी कशा सांभाळायच्या हे गुलाम नबी आझाद यांच्याकडून शिकणं गरजेचं असल्याचंही मोदी म्हणाले.
संसदेत गुलाम नबी आझाद यांनी स्वतःचं वेगळेपण नेहमी सिद्ध केलं आहे. पक्षाची चिंता करण्यासोबतच सभागृहाचं कामकाज सुरळीतपणे पार पडावं याकडेही त्यांचं विशेष लक्ष असायचं. भविष्यकाळात गुलाम नबी आझाद यांचं कार्य येणाऱ्या खासदारांना नक्कीच प्रेरणा देईल असं म्हणत मोदी यांनी आझाद यांचं कौतुक केलं.
ADVERTISEMENT