बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे नेमके कुठे आहेत? ते भाजपच्या जवळ जात आहेत का? अशा प्रकारच्या चर्चांना मागील काही दिवसांत उधाणं आलं आहे. याचं कारण ऑक्टोबरमध्ये कोल्हेंनी अमित शहांची दिल्ली येथे घेतलेली भेट, त्यानंतर राष्ट्रवादीच्या शिर्डीतील शिबीरासह इतर कार्यक्रमांना त्यांची अनुपस्थिती आणि आता गुजरात विधानसभेच्या स्टार प्रचारकांच्या यादीमधून अमोल कोल्हे यांना वगळं असल्याची बातमी.
ADVERTISEMENT
या यादीत शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार, जितेंद्र आव्हाड यांच्यासह राष्ट्रवादीच्या सर्वच मोठ्या नेत्यांची नावं या यादीत टाकण्यात आली आहेत. पण अमोल कोल्हेंना या यादीतून का वगळण्यात आलं? असा सवाल विचारला जाऊ लागला आहे. मात्र या सगळ्याबाबत शनिवारी बारामतीमध्ये बोलत असताना राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी भाष्य केलं आहे.
अजित पवार काय म्हणाले?
अजित पवार यांना अमोल कोल्हे यांच्याबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले, मला त्याच्याबद्दल काही माहिती नाही. तुम्ही प्रश्न विचारलेला आहे, पण मी त्याच्याबद्दलची माहिती घेतो. कारण मी उद्या दिवसभर उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. रोज कुठल्या ना कुठल्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतो. परंतु आपण जे सांगत आहात, मध्येही अशाच प्रकारची एक बातमी आली होती. त्यावेळेस मी डॉ. कोल्हे यांच्याशी संपर्क साधला होता. आम्ही दोघे एकमेकांच्या संपर्कात आहे. मीडियामध्ये बातम्या बघितल्यानंतर त्याच्या संदर्भामध्ये नक्की वस्तुस्थिती काय ते मी समजून घेईल, असं अजित पवार म्हणाले.
अमोल कोल्हे पक्षावर नाराज?
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारल्याने अभिनेते असलेले डॉ. अमोल कोल्हे घराघरात पोहचले. राजकारणात त्यांची सुरुवात शिवसेनेतून झाली असली तरी पुढे त्यांनी थेट राष्ट्रवादीत प्रवेश करत शिरुर मतदार संघाची लोकसभेची निवडणूक लढवली. यात त्यांनी शिवसेनेच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव केला.
त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकांमध्ये ते राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक होते. राज्यातील विविध भागांमध्ये त्यांनी सभा गाजवल्या. त्यांच्या वक्तृत्वशैलीमुळे त्यांना नेहमीच भाषणांची संधी दिली जात होती. लोकसभेत देखील त्यांनी हिंदीत केलेल्या भाषणांची बरीच चर्चा झाली होती. असं असतानाही गुजरात सारख्या महत्त्वाच्या राज्याच्या निवडणुकीच्या प्रचारातून त्यांना वगळल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
या अनुपस्थितीवर जेव्हा पत्रकारांकडून अमोल कोल्हे यांना प्रश्न विचारण्यात आले त्यावेळी तब्येत बरी नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली होती. याबाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनासुद्धा कळवल्याचं त्यांनी सांगितलं होतं.
मात्र ऑक्टोबरमध्ये कोल्हेंनी अमित शहांची दिल्ली येथे भेट घेतली होती. यावेळी देखील कोल्हे भाजपमध्ये जाणार का अशा चर्चा रंगल्या होत्या. परंतु ही भेट कोल्हेंचा शिवप्रताप गरुडझेप या चित्रपटाचे निमंत्रण देण्यासाठी घेतल्याचे सांगण्यात आले होते. अशातच आता स्टार प्रचारकांच्या यादीतून त्यांचे नाव काढल्याने खरंच कोल्हे पक्षावर नाराज आहेत का असा प्रश्न विचारला जात आहे.
ADVERTISEMENT