मुंबई: क्रूझ ड्रग्स पार्टी प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी आज (16 ऑक्टोबर) सुरुवातीला ट्विटरच्या माध्यमातून काही NCB वर काही गंभीर आरोप केले. मात्र, त्यानंतर थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेत त्यांनी NCB चे अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात पुन्हा काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
ADVERTISEMENT
नवाब मलिक यांनी आपल्या पत्रकार परिषदेत थेट असं म्हटलं आहे की, NCB ज्या कारवाया करत आहे त्या बनावट आहे. नवाब मलिकांचं म्हणणं आहे की, त्यांच्या हाती जे काही कागदपत्र लागले आहेत. त्यानुसार काही पंच जे यांचे कौटुंबिक मित्र आहेत तेच NCB च्या अनेक केसमध्ये पंच असल्याचं दिसतं आहे. यात त्यांनी फ्लेचर पटेल या व्यक्तीचा उल्लेख केला आहे.
नवाब मलिकांनी NCB वर नेमका काय आरोप केलाय?
फ्लेचर पटेल नावाचा हा एकच व्यक्ती NCB ने केलेल्या तीन छापेमारीमध्ये पंच किंवा साक्षीदार कसा काय असू शकतो? एवढंच नव्हे तर हा व्यक्ती NCB चे अधिकारी समीर वानखेडे यांचा कौटुंबिक मित्र आहे. कारण समीर वानखेडे यांच्या एका महिला नातेवाईकासोबत त्याचे फोटो आहेत. ज्यामध्ये तो त्या महिलेला ‘लेडी डॉन’ आण ‘सिस्टर’ असं म्हणतोय. त्यामुळे हा ‘फ्लेचर पटेल’ आणि ती ‘लेडी डॉन’ नेमके कोण? याचं उत्तर समीर वानखेडे यांनी द्यावं. असं नवाब मलिक यांनी यावेळी म्हटलं आहे.
NCB… फ्लेचर पटेल आणि लेडी डॉन, नेमकं प्रकरण काय?
NCB ने क्रूझ ड्रग्स प्रकरणात जी कारवाई केली त्यातील मनिष भानुशाली आणि केपी गोसावी या दोघांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर नवाब मलिक यांनी आता तिसरा व्यक्ती फ्लेचर पटेल याच्याबाबत NCB कडे काही सवाल उपस्थित केले आहेत.
‘केपी गोसावी आणि मनिष भानुशाली यांना आपण दोन तारखेच्या आधी ओळखत नव्हतो असं NCB अधिकारी सांगतात. पण ते अनेक प्रकरणात पंच असल्याचं समजतं आहे. तसंच आता फ्लेचर पटेल नावाची व्यक्ती नेमकी कोण आहे याबाबत समीर वानखेडे यांना उत्तर द्यावं लागेल.’
‘मिळालेल्या माहितीनुसार, 25 नोव्हेंबर 2020 रोजी NCB ने केलेल्या छापेमारीत फ्लेचर पटेल हेच पंच होते. त्यानंतर 9 डिसेंबर 2020 आणि 2 जानेवारी 2021 रोजी केलेल्या छापेमारीत देखील फ्लेचर पटेल हाच पंच होता. एकच व्यक्ती हा तीन-तीन ठिकाणी छापेमारीत कसा काय उपस्थित असू शकतो? छापेमारी वेळी एनसीबीला दुसरा कोणताही व्यक्ती सापडला नाही पंच म्हणून?… त्यामुळे आमचं ठाम म्हणणं आहे की, या सगळ्या कारवाया आणि छापे बनावट आहेत.’
‘समीर वानखेडे यांच्या एक नातेवाईक या एका राजकीय पक्षाच्या चित्रपट संघटनेच्या पदाधिकारी आहेत. याच महिलेसोबत हा त्यांच्या घरी जाऊन सेल्फी काढतो आणि ‘माय लेडी डॉन सिस्टर’ असंही म्हणतो.. त्यामुळे आमचा सवाल आहे की, या लेडी डॉनच्या माध्यमातून फ्लेचर पटेल हा सिनेसृष्टीतील लोकांवर दबाव आणतोय का? या सगळ्याबाबत समीर वानखेडे यांनी खुलासा करावा.’
‘फोटोमधील ती लेडी डॉन कोण आणि फ्लेचर पटेलशी नेमका संबंध काय या सगळ्या प्रश्नाची उत्तरं समीर वानखेडेंनी द्यावीत. कारण छापेमारीत आपल्याच जवळच्या व्यक्तींना पंच बनवून खोट्या कारवाया करुन सिनेसृष्टीतील लोकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न NCB करत आहे. असा आमचा आरोप आहे.’ असं नवाब मलिक हे यावेळी म्हणाले.
क्रूझ ड्रग्ज केस: प्लेचर पटेल आणि NCB अधिकाऱ्यांचा काय संबंध? नवाब मलिकांचा ट्विटरद्वारे आणखी एक गौप्यस्फोट
मागील काही दिवसांपासून नवाब मलिक हे सातत्याने एनसीबीच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्न उपस्थित करत आहेत. वेगवेगळे मुद्दे आणि त्यासंबंधची काही फोटो आणि व्हीडिओ समोर आणून ते सरळ एनसीबीच्या कामकाजाविषयी संशय व्यक्त करत आहे. यामुळे आता NCB बाबत एक गूढ निर्माण झालं आहे. अशा परिस्थितीत आता एनसीबी नेमकं काय स्पष्टीकरण देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT