इम्तियाज मुजावर, प्रतिनिधी, सातारा
ADVERTISEMENT
सातारा : सातारा जिल्ह्यातील कोरेगाव मतदारसंघात सध्या पार्थ पवार यांची चर्चा रंगलेली पहायला मिळत आहे. पार्थ पवार यांच्या वाढदिवसाचे बॅनर्स सुद्धा कोरेगाव तालुक्यात लावण्यात आले होते. यामुळे पार्थ पवार कोरेगावच्या राजकारणात प्रवेश करणार का? अशा चर्चा आता रंगू लागल्या आहेत.
पार्थ पवार हे राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र आहेत. त्यामुळे पार्थ पवार यांच्या विषयी होत असलेल्या चर्चा या महत्वाच्या मानल्या जात आहेत. कोरेगाव विधानसभा मतदारसंघ हा एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला होता. मात्र, २०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांचा पराभव झाल्यामुळे मतदारसंघ हातातून निसटला शिवसेनेचे नेते आमदार महेश शिंदे यांनी या ठिकाणी विजय मिळवत मतदारसंघ ताब्यात घेतला.
सध्या कोरेगावचे आमदार महेश शिंदे असले तरी मात्र आता या ठिकाणी वेगळ्याच चर्चांना उधाण आल्याचं पहायला मिळतं. अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार असून तयारी सुरु केली असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत आणि याच चर्चेवर आमदार महेश शिंदे यांची प्रतिक्रिया माध्यमांनी जाणून घेतली. यावर त्यांनी पार्थ पवार यांना ‘वेलकम टू कोरेगाव’ असं म्हटलं आहे. परंतु, जरंडेश्वर कारखाना आम्ही पुन्हा परत मिळवला हे विसरु नका असं सांगत इशाराच दिला आहे.
यामुळे या ठिकाणी भविष्यात काय घडामोडी घडणार हे पहावं लागणार आहे. आमदार महेश शिंदे हे एकेकाळी अजित पवार यांचे विश्वासातील नेते होते. मात्र, महेश शिंदे भाजपमध्ये गेल्या नंतर सगळी सूत्रं फिरली. त्यांनी निवडणुक तिकीटासाठी पक्ष बदलत शिवसेनेत प्रवेश केला आणि ते निवडूनही आले. असं असलं तरी अजूनही शिंदे हे अजित पवारांच्या संपर्कात असल्याचं बोललं जातं. यामुळे महेश शिंदे यांनी पार्थ पवारांना केलेलं वेलकम कशा पद्धतीने घ्यायचं याचा सभ्रम आहे.
ADVERTISEMENT