NCP: ‘दिल्लीच्या तख्तासमोर महाराष्ट्र झुकत नाही’, राष्ट्रवादीने ‘तो’ व्हीडिओ का केला शेअर?

मुंबई तक

• 01:21 PM • 27 Sep 2021

मुंबई: महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेते हे सध्या ईडीच्या रडारवर आहेत. गेले अनेक महिने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षातील वेगवेगळ्या नेत्यांना ईडीकडून सातत्याने समन्स धाडले जात आहेत. तर काही जणांना चौकशीसाठी देखील बोलावलं जात आहे. असं असताना राष्ट्रवादी काँग्रेसने एक व्हीडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये राष्ट्रवादीने भाजपला बरोबर 2 वर्षांपूर्वीच्या दिवसाची आठवण […]

Mumbaitak
follow google news

मुंबई: महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेते हे सध्या ईडीच्या रडारवर आहेत. गेले अनेक महिने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षातील वेगवेगळ्या नेत्यांना ईडीकडून सातत्याने समन्स धाडले जात आहेत. तर काही जणांना चौकशीसाठी देखील बोलावलं जात आहे. असं असताना राष्ट्रवादी काँग्रेसने एक व्हीडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये राष्ट्रवादीने भाजपला बरोबर 2 वर्षांपूर्वीच्या दिवसाची आठवण करुन दिल्ली आहे.

हे वाचलं का?

‘दिल्लीच्या तख्तासमोर महाराष्ट्र कधीही झुकत नाही’, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजपविरोधात रणशिंग फुकलं होतं. ईडीकडून पवारांना पाठविण्यात आलेल्या समन्सनंतर स्वत: पवारांनी बरोबर आजच्याच दिवशी (27 सप्टेंबर 2019) आपण स्वत: ईडीच्या कार्यालयात हजर राहू असं जाहीर केलं होतं. ज्यानंतर संपूर्ण राज्यातील राजकारण अक्षरश: ढवळून निघालं होतं.

‘त्या’ दिवशी काय घडलं होतं?

महाराष्ट्रात 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात भाजप एकहाती सत्ता मिळवेल असं सातत्याने म्हटलं जात होतं. किंबहुना भाजपकडून तसा प्रचार देखील सुरु होता. असं असताना भाजपने आपल्या सर्व विरोधकांना नामोहरम करण्यास सुरुवात केली होती. यावेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील अनेक दिग्गज नेत्यांना फोडून भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला होता. या सगळ्याचा कळस म्हणजे याच दरम्यान, शरद पवार यांना ईडीने एका प्रकरणात समन्स बजावलं होतं.

राज्यात भाजपच्या बाजूने झुकणार मतदारांचा कल लक्षात घेऊन पवारांनी ईडीच्या आलेल्या समन्सचा पुरेपूर वापर आपल्यासाठी करुन घेतला. ईडीने समन्स बजावल्यानंतर शरद पवार यांनी स्वत: 25 सप्टेंबर 2019 पत्रकार परिषद घेऊन आपण 27 सप्टेंबर रोजी स्वत: ईडीच्या कार्यालयात जाणार आहोत असं जाहीर केलं होतं.

यावेळी पवार असंही म्हणाले होते की, ‘माझ्या संदर्भातील जी काही माहिती त्यांना हवी असेल ती मी त्यांना देईनच. त्याशिवाय, त्यांचा जो काही पाहुणचार असेल तोही घेणार आहे. महाराष्ट्र राज्य हे शिवछत्रपतींचं राज्य आहे. या राज्यातील लोकांमध्ये शिवछत्रपतींचे संस्कार भिनलेले आहेत त्यामध्ये दिल्लीच्या तख्तासमोर झुकण्याचा संस्कार आम्हाला शिकवलेला नाही.’ असं म्हणत पवारांनी त्यावेळी केंद्रातील आणि राज्यातील तत्कालीन भाजप सरकारला थेट आव्हान दिलं होतं.

दरम्यान, स्वत: पवारांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकच उत्साह संचारला होता आणि त्यांचे सगळे कार्यकर्ते भाजपविरुद्ध चांगलेच आक्रमक झाले होते. 27 सप्टेंबर रोजी संपूर्ण राज्यातून हजारो कार्यकर्ते हे मुंबईत दाखल झाले होते. ज्यामुळे मुंबईत प्रचंड तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

….मुख्यमंत्र्यांच्या पुढं आमचं काही चालत नाही-अजित पवार

अखेर जनरेटा लक्षात घेऊन त्यावेळी ईडीने शरद पवारांना कळवलं की, आपल्याला चौकशीसाठी येण्याची गरज नाही. तूर्तास तशी कोणतीही आवश्यकता नाही. ईडीने असं कळवताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष केला. हाच उत्साह कायम ठेवत राष्ट्रवादीने अतिशय प्रतिकूल परिस्थितीत विधानसभा निवडणुकीत भाजपला एकहाती सत्ता मिळविण्यापासून रोखलं.

यावेळी राष्ट्रवादीने भाजपला फक्त रोखलंच नाही तर एकूण राजकीय परिस्थितीचा योग्यरित्या फायदा घेऊन त्यांनी भाजपला सत्तेतून खाली देखील खेचलं. मात्र, या सगळ्याची सुरुवात ही 27 सप्टेंबर 2019 या दिवसापासून झाली होती. त्यामुळे याच दिवसाचं महत्त्व लक्षात घेऊन राष्ट्रवादीने एक खास व्हीडिओ आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर केला आहे.

‘सुडाच्या राजकारणाला मात देणारा, महाराष्ट्रातील घडामोडींना निर्णायक वळण देणारा, दिल्लीच्या तख्तासमोर महाराष्ट्र झुकत नाही, या इतिहासाची पुनरावृत्ती करणारा हाच तो दिवस…,’ असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस या सगळ्या घटनेवरचा व्हीडिओ शेअर केला आहे.

    follow whatsapp