गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारमधल्या घटकपक्षांनी स्वबळाची भाषा करायला सुरुवात केल्यामुळे राज्यात चर्चांना उधाण आलेलं आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनीही आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेस स्वबळावर लढण्याबद्दल वक्तव्य केलं होतं. परंतू काँग्रेसचा हा स्वबळाचा आग्रह शेवटपर्यंत टिकेल असं वाटत नाही अशी प्रतिक्रीया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.
ADVERTISEMENT
राष्ट्रवादी पक्ष स्वबळाची चाचपणी करत नाहीये पण तीन पक्षापैकी एक पक्ष जर स्वबळाचा आग्रह धरत असेल तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा एकत्र लढण्याचा विचार पक्का आहे. काँग्रेसचा स्वबळाचा आग्रह शेवटपर्यंत टिकेलं असं वाटत नाही. काँग्रेसला आम्ही सोबत घेण्याचा प्रयत्न करु, तिन्ही पक्ष समजुतदार आहेत. जयंत पाटील उस्मानाबाद दौऱ्यावर पत्रकारांशी बोलत होते.
यावेळी बोलत असताना जयंत पाटील यांनी भाजपमधून राष्ट्रवादीत येणाऱ्या इच्छुकांची संख्या जास्त असल्याचं सांगितलं. मंदिर उघडल्यानंतर त्यांच्या पक्षप्रवेशाचा मुहुर्त सापडेल. अनेक नेते स्वगृही परतण्यास उत्सुक आहेत परंतू कोरोनामुळे त्यांचे पक्षप्रवेश रखडले आहेत. स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांशी चर्चा करुन बेरजेचं राजकारण करत या सर्व नेत्यांना टप्प्या टप्प्याने प्रवेश दिला जाईल असंही पाटील यांनी स्पष्ट केलं.
ADVERTISEMENT