उजनीच्या पाण्यावरुन महाविकास आघाडीत ठिणगी, शिवसेना आमदाराची शरद पवारांवर घणाघाती टीका

मुंबई तक

• 12:05 PM • 17 May 2021

एकीकडे संपूर्ण राज्य कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा सामना करत असताना सोलापूर जिल्ह्यात उजनी धरणाच्या पाण्याचा वाद पुन्हा एकदा पेटला आहे. उजनी धरणातलं ५ टीएमसी पाणी इंदापूर तालुक्याला वळवण्यासाठीची मान्यता पालकमंत्री दत्ता भरणे यांनी मिळवली आहे. या निर्णयाला सोलापुरातील नेत्यांचा विरोध होताना दिसतो आहे. सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी शरद पवारांवर घणाघाती टीका करत सत्ता मिळवल्यानंतर […]

Mumbaitak
follow google news

एकीकडे संपूर्ण राज्य कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा सामना करत असताना सोलापूर जिल्ह्यात उजनी धरणाच्या पाण्याचा वाद पुन्हा एकदा पेटला आहे. उजनी धरणातलं ५ टीएमसी पाणी इंदापूर तालुक्याला वळवण्यासाठीची मान्यता पालकमंत्री दत्ता भरणे यांनी मिळवली आहे. या निर्णयाला सोलापुरातील नेत्यांचा विरोध होताना दिसतो आहे.

हे वाचलं का?

सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी शरद पवारांवर घणाघाती टीका करत सत्ता मिळवल्यानंतर पवारांनी फक्त बारामतीचाच विकास केला अशी टीका केली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये उजनीच्या पाण्यावरुन महाविकास आघाडी सरकारमध्ये नवा वाद तयार होण्याची चिन्ह दिसत आहेत.

उजनीचं ५ टीएमसी पाणी पळवण्याचं प्रकरण आहे तरी काय?

सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले दत्ता भरणे यांनी इंदापूरमधील २२ गावांसाठी उजनी धरणातून सांडपाण्याच्या नावावर ५ टीएमसी पाणी वळवण्यासाठीची मान्यता मिळवली आहे. उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीचा या निर्णयाला विरोध आहे. या निर्णयाविरोधात सोलापुरात आज हलगी बजाव आंदोलन करण्यात आलं, ज्यात शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील सहभागी झाले होते.

पवारांनी फक्त बारामतीचाच विकास केला – सेना आमदाराची टीका

राज्यात ज्या ज्या वेळी शरद पवार किंवा त्यांच्या नेतृत्वाखालचं सरकार आलंय त्यावेळी त्यांनी फक्त बारामतीचा विकास केला आहे. राज्यातला सगळा निधी बारामतीला न्यायचा आणि बारामती हे विकासाचं मॉडेल आहे असं देशभर सांगायचं ही पवारांची पद्धत आहे. याआधी यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, सुधाकरराव नाईक या नेत्यांनी नेहमी राज्याचा विकास पाहिला परंतू पवारांनी फक्त बारामतीचाच विकास केल्याचा आरोप शहाजीबापू पाटलांनी केला.

सध्या सोलापुरात उजनी धरणाचा मुद्दा चांगलाच पेटला असून यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस बॅकफूटवर फेकलं जाण्याची चित्र निर्माण झालं आहे. पालकमंत्री दत्ता भरणे यांच्या निर्णयाचा फटका आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसला बसेल अशी शक्यता स्थानिक पत्रकार आणि राजकीय विश्लेषकांनी वर्तवली आहे.

    follow whatsapp