भाजपचे आमदार नितेश राणेंवर ठाकरे गटाच्या जामसंडेच्या नगराध्यक्षा साक्षी गजानन प्रभू यांनी केलेल्या आरोपानं खळबळ उडाली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सोडून भाजपत प्रवेश करण्यासाठी आमदार नितेश राणे यांनी धमकी दिली असून, आमच्या जिवाचं बरं वाईट झाल्यास नितेश राणे, नगरसेविका प्रणाली माने आणि मिलिंद माने हे जबाबदार असतील, असा आरोप नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांनी केलाय.
ADVERTISEMENT
ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट आणि भाजप असा राजकीय संघर्ष शिवसेनेत झालेल्या बंडाळीपासून बघायला मिळत आहे. त्यात आता नितेश राणे यांच्यावर ठाकरे गटाच्या जामसंडे नगरपालिकेच्या नगराध्यक्षा साक्षी गजानन प्रभू यांनी गंभीर आरोप केला आहे. साक्षी प्रभू यांनी देवगड पोलीस आणि सिंधुदुर्गच्या पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे.
साक्षी प्रभू यांनी नितेश राणेंवर काय केलाय आरोप?
साक्षी प्रभू यांनी नितेश राणे यांच्यावर आरोप करताना म्हटलं आहे की, ‘भाजप नेते आणि देवगडचे आमदार नितेश राणे यांच्याकडून व त्यांच्या कार्यकर्त्यांकडून माझ्यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष सोडून भाजपत प्रवेश करण्यासाठी दबाब टाकला जात होता. याकडे मी दुर्लक्ष केलं. मात्र, 7 नोव्हेंबर रोजी 12.30 वाजता माझ्या घरी भाजप नगरसेविका प्रणाली माने आणि त्यांचे पती मिलिंद माने हे आले होते.’
‘त्यांनी (प्रणाली माने व मिलिंद माने) मला त्यांच्या मोबाईलवरून नितेश राणे यांच्याशी बोलणं करून दिलं. त्यावेळी नितेश राणे यांनी मला धमकी दिली की, तुम्ही पुढील 10 दिवसांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सोडून भाजपत प्रवेश करावा, अन्यथा आम्ही तुम्हाल बदनाम करायला सुरूवात करणार. यावर मी त्यांना विचारलं असता ते (नितेश राणे) म्हणाले, तुम्ही खोटी बिलं काढली आहेत असा आरोप मी करणार आहे. त्यात तुम्हाला आणि तुमच्या बाकीच्या नगरसेवकांना अडकवणार, असा खोटा व खोडसाळ आरोप माझ्यावर व सहकारी नगरसेवकांवर करणार असल्याचं सांगितलं.’
‘भाजपमध्ये आल्यास तुम्हाला 25 लाख रुपये देऊ’, नितेश राणेंनी ऑफर दिल्याचा आरोप
साक्षी प्रभू म्हणाल्या की, ‘तुम्ही भाजपमध्ये आल्यास 25 लाख रुपये देऊ शिवाय नगराध्यक्ष पदही देऊ, अशी मला ऑफर दिली. त्यावर मी त्यांना स्पष्ट नकार दिला. हे सगळं झाल्यानंतर प्रणाली माने व मिलिंद माने निघून गेले. त्यानंतर 24 नोव्हेंबरला रात्री 10.05 वाजता व 10.10 वाजता असे दोनदा फोन केले. तो कॉल नितेश राणेंचा असल्याचं ट्रूकॉलरवर लक्षात आलं. त्यामुळे ते फोन उचलले नाहीत’, असं साक्षी प्रभूंनी तक्रारीत म्हटलंय.
‘माझ्या मुलीवर नितेश राणे आणि त्यांचे कार्यकर्ते माझ्यावर व माझ्या मुलीवर पाळत ठेवून आहेत, असं मला वाटू लागलं आहे. मला व माझ्या कुटुंबीयांना आमदार नितेश राणे यांच्यापासून धोका असून आपले बरे वाईट झाल्यास नितेश राणे, प्रणाली माने, मिलिंद माने यांना जबाबदार धरावे’, असं साक्षी प्रभू यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT