चला हवा येऊ द्या’ चे निवेदक आणि दिग्दर्शक निलेश साबळे व त्यांच्या टीमने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची पाया पडून माफी मागितली आहे. झी मराठीवर दाखविण्यात आलेल्या ‘दिवाळी अधिवेशन’ या कार्यक्रमात नारायण राणे यांच्यांशी संबंधित जे पात्र दाखविण्यात आले होते, ते राणेंची बदनामी होईल असे होते.
ADVERTISEMENT
त्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्याचा आरोप राणे समर्थकांकडून करण्यात आला होता. त्यानंतर राणे यांची हात जोडून माफी मागत साबळे व त्यांच्या टीमने या वादावर पडदा टाकण्याचे प्रयत्न केला आहे.
झी मराठीवरील हा शो प्रदर्शित झाल्यानंतर अनेक राणे समर्थकांनी ‘झी मराठी आणि निलेश साबळे’ यांना फोन करून आपला संताप व्यक्त केला असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे निलेश साबळे यांनी आपल्या टीमसह नारायण राणे यांच्या ‘अधिश’ निवासस्थानी जात त्यांची भेट घेतली व हात जोडून, पाया पडून नमस्कार करत दिलगिरी व्यक्त केली.
यावेळी भाजप आमदार आणि नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणेही उपस्थित होते. काही राणे समर्थक आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी ट्विटरवरुन याबाबत माहिती दिली आहे.
नारायण राणे हे ‘चला हवा येऊ द्या’चे रसिक प्रेक्षक असून त्यांनी वेळोवेळी कलाकारांचा सन्मानच केला आहे. कोणाच्याही भावना दुखावाण्याचा आमचा उद्देश नव्हता. पण आमच्या टीमकडून परत अशी कोणतीही चूक होणार नाही असे निलेश साबळे यावेळी म्हणाले असल्याची माहितीही राणे समर्थकांनी दिली आहे.
ADVERTISEMENT