नितेश राणेंना दिलेला दिलासा कायम ठेवण्यात आला आहे. अटकपूर्व जामीन अर्जावरची सुनावणी पूर्ण होत नाही तोपर्यंत अटक करणार नाही अशी ग्वाही राज्य सरकारने कोर्टात दिली आहे. गुरूवारी दुपारी एक वाजता पुन्हा या प्रकरणी सुनावणी होणार आहे. नितेश राणे यांच्या वतीने ज्येष्ठ वकील नितीन प्रधान यांनी कोर्टात युक्तिवाद केला.
ADVERTISEMENT
सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना उमेदवार सतीश सावंत यांचा प्रचार करणारे शिवसैनिक संतोष परब यांच्यावर 18 डिसेंबर रोजी जीवघेणा हल्ला झाला होता. या प्रकरणी नितेश राणे यांची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर नितेश राणे यांनी अटक पूर्व जामीनासाठी सिंधुदुर्गातील न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने हा अर्ज फेटाळला. त्यानंतर नितेश राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
4 जानेवारीला या प्रकरणाची सुनावणी पार पडली होती. त्यानंतर आज नितीन प्रधान यांनी नितेश राणे यांची बाजू मांडली. नितेश राणे यांना 4 तारखेला दिलासा मिळाला होता तो आजही कायम ठेवण्यात आला आहे. दरम्यान आज प्रधान यांनी हे देखील सांगितलं की 23 डिसेंबरला म्याव म्याव असा आवाज नितेश राणेंनी काढला होता. त्यानंतर शिवसेनेने राणेंना धडा शिकवू असं वक्तव्य केलं होतं त्यामुळे हे सगळं प्रकरण घडल्याचं म्हटलं आहे. आज प्रधान यांचा युक्तिवाद संपला आहे. दरम्यान राज्य सरकारने अटकपूर्व जामिनावरची सुनावणी पूर्ण होत नाही तोपर्यंत नितेश राणेंना अटक होणार नाही असं म्हणत त्यांचा दिलासा कायम ठेवला आहे.
काय आहे प्रकरण?
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचारप्रमुख संतोष परब यांच्यावर १८ डिसेंबर रोजी झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी पोलिसांना चौघांना अटक केली आहे. संतोष परब यांनी हल्लेखोरांनी नितेश राणेंच्या नावाचा उल्लेख केल्याचा आरोप केला आहे. दरम्यान नितेश राणे यांचा ठावठिकाणा शोधण्यासाठी पोलिसांनी थेट केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनाच नोटीस बजावून कणकवली पोलीस स्थानकात बोलावलं होतं. पण कामात व्यस्त असल्याचं सांगत नारायण राणे यांनी हजर राहणं टाळलं.
ADVERTISEMENT