कोणतंही सरकार आनंदाने लॉकडाउन करत नाही, विरोधकांनी राजकारण करु नये – संजय राउत

मुंबई तक

• 05:17 AM • 07 Apr 2021

महाराष्ट्रातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने विकेंड लॉकडाउनची घोषणा केली आहे. परंतू राज्य सरकारच्या ब्रेक द चेन या नियमांमधील विसंगतीमुळे अनेक शहरांत व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम पहायला मिळाला. ज्यानंतर विरोधीपक्षातील भाजप, मनसेनेही मुख्यमंत्र्यांना छोट्या दुकानदारांना आठवड्यातील काही दिवस दुकानं सुरु ठेवण्याची परवानगी मागितली. भाजपने लॉकडाउनच्या नियमांना विरोध करत सरकारवर पुन्हा एकदा टीका करायला सुरुवात केली आहे. […]

mumbaitak

mumbaitak

follow google news

महाराष्ट्रातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने विकेंड लॉकडाउनची घोषणा केली आहे. परंतू राज्य सरकारच्या ब्रेक द चेन या नियमांमधील विसंगतीमुळे अनेक शहरांत व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम पहायला मिळाला. ज्यानंतर विरोधीपक्षातील भाजप, मनसेनेही मुख्यमंत्र्यांना छोट्या दुकानदारांना आठवड्यातील काही दिवस दुकानं सुरु ठेवण्याची परवानगी मागितली. भाजपने लॉकडाउनच्या नियमांना विरोध करत सरकारवर पुन्हा एकदा टीका करायला सुरुवात केली आहे. विरोधी पक्षांच्या आरोपांना उत्तर देताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधकांना टोला लगावत कोणतंही सरकार आनंदाने लॉकडाउन करत नाही असं म्हटलंय.

हे वाचलं का?

देशात कुठेही कोरोनाच्या लसीचा तुटवडा नाही – आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांचं स्पष्टीकरण

“कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव हे राष्ट्रीय संकट आहे, ही एका प्रकारची वैद्यकीय आणीबाणी आहे. आरोप-प्रत्यारोप करुन या विषयाचं राजकारण विरोधीपक्षांनी करु नये. देशातल्या प्रत्येक नागरिकाचा जीव महत्वाचा आहे. एकमेकांना सहकार्य करुन हे सर्व विषय मार्गी लावणं गरजेचं आहे. महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षांची भूमिका अचानक बदलली आहे. कोणतंही सरकार हे आनंदाने लॉकडाउन करत नाही, सध्याची आपत्कालीन परिस्थिती पाहता सरकारला लॉकडाउनचा निर्णय घ्यावा लागला आहे.” संजय राऊत मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

राजकारण करण्यासाठी आपल्याकडे उभा जन्म आहे, परंतु सध्याची परिस्थिती पाहता पुढचे काही महिने विरोधी पक्षाने महाराष्ट्र सरकारच्या हातात हात घालून कोरोनाविरुद्धची लढाई लढली पाहिजे असं सांगायलाही संजय राऊत विसरले नाही. दरम्यान एकीकडे संजय राऊत विरोधकांना सहकार्य करण्याचं आवाहन करत असले तरीही सरकारमधील मंत्र्यांकडूनच आता ब्रेक द चेन च्या नियमांना विरोध होताना दिसतोय.

नागपूर : रेमिडेविसीर इंजेक्शन यापुढे मेडीकलमध्ये विकण्यास बंदी

अमरावती जिल्ह्यात या आधी लावण्यात आलेलं लॉकडाउन आणि त्यानंतर रुग्णसंख्येत झालेली घट पाहता यशोमती ठाकूर यांनी ही मागणी केल्याचं समजतंय. फेब्रुवारी महिन्याच्या मध्यावधीपासून अमरावतीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढायला लागली होती. यासाठी अमरावतीमध्ये लॉकडाउन लावण्यात आलं होतं. परंतू बाधितांच्या संख्येत घट व्हायला लागल्यानंतर हे निर्बंध आणि लॉकडाउन हटवण्यात आलं. त्यामुळे अमरावती मधली सध्याची परिस्थिती पाहता नव्या अधिसूचनेचा पुनर्विचार होणं गरजेचं असल्याचं यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे. अमरावती जिल्ह्यात निर्बंध शिथिल करुन व्यापारी वर्गाला व्यवसाय सुरु करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी यशोमती ठाकूर यांनी आपल्या निवेदनात केली आहे.

याआधी लावण्यात आलेल्या लॉकडाउनला अमरावतीत व्यापारी वर्गाने चांगला प्रतिसाद दिला होता. आता परिस्थिती सुधारत असतानाच…नवे निर्बंध आल्यामुळे व्यापारी आणि नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होते आहे. अनेक उद्योग-व्यवसाय बंद राहिल्यामुळे यामधून नुकसान होतं आहे. त्यामुळे अमरावती जिल्ह्यापुरते निर्बंध शिथिल करण्यात येऊन व्यापाऱ्यांना दुकानं उघडी ठेवण्याची परवानगी द्यावी अशी मागणी ठाकूर यांनी केली आहे.

    follow whatsapp