देशात कोरोनाबरोबरच ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अवघ्या काही दिवसांतच देशातील रुग्णसंख्येचा वेग वाढला असून, त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. यातच आता आयआयटी कानपूर येथील वरिष्ठ प्राध्यापक मणिंद्र अग्रवाल यांनी वाढत असलेल्या रुग्णसंख्येबद्दल महत्त्वाचं भाष्य केलं आहे.
ADVERTISEMENT
ओमिक्रॉनचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या फेब्रुवारीमध्ये शिखर गाठेल, पण रुग्णांना रुग्णालयात दाखल करावं लागणार नाही. फेब्रुवारीनंतर लाट ओसरायला सुरूवात होईल, असं प्रा. अग्रवाल यांनी गणितीय अभ्यासाच्या आधारे म्हटलं आहे. प्रा. अग्रवाल यांनी कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेबद्दलही भाष्य केलं होतं.
गणितीय मॉडेलच्या आधारे प्रा. अग्रवाल यांनी हा अंदाज व्यक्त केला आहे. दक्षिण आफ्रिकेची भारताशी तुलना केली असता दोन्ही देशांची लोकसंख्या आणि नैसर्गिक प्रतिकारक शक्ती एकसमान आहे. दक्षिण आफ्रिकेत 17 डिसेंबर रोजी ओमिक्रॉन रुग्णांची संख्या उच्चाकांवर पोहोचली होती. आता तिथे रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे. दक्षिण आफ्रिकेप्रमाणेच भारतातही ओमिक्रॉन बाधित रुग्णांची संख्या वाढेल, पण त्यांना रुग्णालयात भरती करावं लागणार नाही. युरोपमध्ये नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यानं तिथे रुग्ण वाढत आहेत, असं अग्रवाल म्हणाले.
देशातील पाच राज्यांत विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. याबद्दल बोलताना प्रा. अग्रवाल म्हणाले, निवडणुकांबद्दल मला जास्त माहिती नाहीये. मी इतकंच म्हणू शकतो की, डेल्टामुळे उद्भवलेल्या दुसऱ्या लाटेतही पाच राज्यांत निवडणुका झाल्या होत्या, मात्र त्या राज्यांमध्ये फार परिणाम दिसला नाही. निवडणुकांबद्दलचा निर्णय निवडणूक आयोगाचा आहे. त्यामुळे फेब्रुवारीत तिसऱ्या लाट शिखरावर असेल, हे लक्षात घेऊन निर्णय घ्यायला हवा, असं अग्रवाल यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT