महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना आज (11 फेब्रुवारी) महाराष्ट्र सरकारने विमान प्रवासास परवानगी नाकारल्याने एकच वादंग निर्माण झाला आहे. या सर्व प्रकारामुळे शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी एकमेकांवर आरोपाच्या फैरी झाडण्यास सुरुवात केली आहे. यानंतर आता राज्यपालांच्या कार्यालयांकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, ‘मुख्यमंत्री कार्यालय आणि राज्य सरकारला संबंधित प्रवासाबाबत २ फेब्रुवारीला कळविण्यात आलं होतं. पण असं असून देखील आज राज्यपाल विमानात बसल्यानंतर त्यानंतर सांगण्यात आलं की, राज्य सरकारकडून जी परवानगी लागते ती मिळालेली नाही. त्यामुळे आपल्याला प्रवास करता येणार नाही.’ असं स्पष्टीकरण देत राज्यपालांनी आता एकप्रकारे राज्य सरकारवरच थेट टीका केली आहे.
ADVERTISEMENT
विमान प्रवासाच्या वादावर राज्यपाल कार्यालयाचं स्पष्टीकरण जसंच्या तसं
१. महाराष्ट्र व गोव्याचे माननीय राज्यपाल श्री. भगतसिंग कोश्यारी हे उत्तराखंड येथील मसूरी येथील लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी येथे आयएएस अधिकाऱ्यांच्या १२२व्या प्रेरणा प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आहेत. हा कार्यक्रम शुक्रवार, 12 फेब्रुवारी 2021 पार पडणार आहे.
२. याच कार्यक्रमासाठी राज्यपाल हे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथून देहरादूनला गुरुवारी 11 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 10 वाजता रवाना होणार होते.
3. या प्रवासाच्या तयारीच्या वेळी राज्यपाल कार्यालयाने महाराष्ट्र सरकारच्या अधिकाऱ्यांना राज्यपालांना सरकारी विमानाच्या वापरास परवानगी मिळावी म्हणून 2 फेब्रुवारी 2021 रोजी पत्र लिहिले होते. याबाबत मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाल देखील कळविण्यात आले होते.
४. आज, 11 फेब्रुवारी 2021 रोजी, राज्यपाल सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (CSIM) पोहोचले आणि सरकारी विमानात चढले. तथापि, माननीय राज्यपालांना सांगण्यात आले की, शासकीय विमानाच्या वापरासाठी त्यांना सरकारकडून परवानगी मिळालेली नाही.
5. माननीय राज्यपालांच्या निर्देशानुसार देहरादूनसाठी व्यावसायिक विमानाचं तिकीट बुक करण्यात आलं. त्यानंतर राज्यपाल हे मुंबई विमानतळावरुन दुपारी १२.१५ वाजता देहरादूनसाठी रवाना झाले.
राज्यपालांच्या या स्पष्टीकरणावर आता राज्य सरकार काय उत्तर देणार हे पाहणं देखील अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT