-मिथिलेश गुप्ता, कल्याण
ADVERTISEMENT
ठाण्याजवळ असलेल्या अंबरनाथमध्ये भरदिवसा अंदाधुंद गोळीबार करण्यात आल्याची घटना घडलीये. घटनेचा व्हिडीओ समोर आला असून, बैलगाडा शर्यतीच्या वादातून दोन गट समोरासमोर आल्याची माहितीय आहे. गोळीबार करण्यात आल्याचा प्रकार सीसीटीव्ही आणि अनेकांनी मोबाईलमध्ये कैद केलाय.
ठाणे जिल्ह्यात बैलगाडा शर्यती सुरू झाल्या असून, यातून वाद उफाळल्यानं अंबरनाथमध्ये तणाव निर्माण झाला होता. बैलगाडा शर्यतीवरून अंबरनाथमध्ये दोन गटात वाद झाला. अंबरनाथमधील एका प्रसिद्ध हॉटेल समोर बैलगाडा शर्यतीच्या वादातून दोन गटात बाचाबाची झाली. वाद शिगेला गेल्यानंतर हॉटेलच्या परिसरातच अंदाधुंद गोळीबार करण्यात आला.
सुदैवानं या गोळीबारात कुणाचाही मृत्यू झाल्याची वा जखमी झाल्याची घटना घडली नाही.
पनवेलमधील पंढरी फडके आणि कल्याणमधील राहुल पाटील हे नेहमीच बैलगाडा शर्यतीमुळे चर्चेत असतात. यापूर्वी दोघांमध्ये वाद झालेले आहेत. गेल्यावर्षी दोघांनाही बैलगाडा शर्यतीत सहभागी होण्यापासून वंचित ठेवण्यात आलं होतं.
दोन्ही गटात वाद होण्याची शक्यता असल्यानं आधीच सावधगिरी बाळगण्यात आली होती. मात्र, बैलगाडा शर्यती सुरू झाल्यानं पुन्हा या गटात वाद झालेत. बैलगाडा शर्यतीच्या अनुषंगाने बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकी दरम्यान पंढरी फडके आणि राहुल पाटील यांच्या गटात शाब्दिक वाद झाला.
वाद विकोपाला गेल्यानंतर फडके गटाकडून पाटील गटावर गोळीबार करण्यात आल्याची माहिती आहे. ही घटना अंबरनाथ एमआयडीसीतील हॉटेल सुदामा परिसरात घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १५ ते २० राऊंड फायर करण्यात आले आहेत.
या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर राहुल पाटील समर्थक मोठ्या संख्येनं परिसरात जमा झाले होते.
ADVERTISEMENT