नितीन शिंदे, पंढरपूर: मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील तीन तोळे सोन्याचे मंगळसूत्र आणि आटपाडी येथे सोन्याच्या दुकानात तलवारीचा धाक दाखवून 53 ग्रॅम सोने लुटीच्या प्रकरणातील आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पंढरपुर पोलिसांना यश आले आहे. सराईत गुन्हेगार अजय संजय आढाव (वय 21 वर्ष) हा माळशिरस तालुक्यातील मेडद येथील आहे.
ADVERTISEMENT
अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून 3 लाख 32 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
आठ सप्टेंबर रोजी शहरातील पुंडलिक नगर ते परदेशीनगर या रस्त्यावर सकाळी सुभाष श्रीकांत माचणूरकर हे पत्नी वृषाली यांच्या समवेत मॉर्निंग वॉक करत होते. या वेळी दुचाकीवरून आलेल्या आढाव याने वृषाली यांच्या गळ्यातील तीन तोळे वजनाची सोन्याचे सुमारे 1 लाख 20 हजार रुपये किमतीचे मणी मंगळसूत्र हिसका मारून तोडून चोरून नेले होते.
याबाबत सुभाष माचणूरकर यांनी पंढरपूर शहर पोलिसात फिर्याद दिली होती. यावेळी पंढरपूर पोलिसांना तपासात संशयित आरोपी आढाव हा सातारा जिल्हा व सत्र न्यायालयाच्या कोठडीत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी जिल्हा व सत्र न्यायालयाकडून पथकाने प्रकरण वर्ग करून आरोपीस ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी त्याने पंढरपुरात देखील आपण चेन स्नॅचिंग केल्याचा गुन्हा कबूल केला. यावेळी त्याच्याकडून 1 लाख 20 हजार रुपये शहरातील किमतीचे तीन तोळे वजनाचे सोन्याचे ऐवज हस्तगत करण्यात आले आहेत.
आरोपीने आटपाडी तालुक्यातील दिघंची येथील सोन्याच्या दुकानात तलवारीचा धाक दाखवून दुकानातील 2 लाख 12 हजार रुपये किमतीचे 53 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने लुटल्याचेही या तपासात समोर आले आहे. हे दागिनेही पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.
पुण्यात मैत्रिणीला गिफ्ट देण्यासाठी ज्वेलर्समध्ये चोरी, मेडिकलच्या दोन विद्यार्थ्यांना अटक
या आरोपीने नातेपुते, सांगोला, दौंड, माळशिरस, शिरवळ, लोणीकाळभोर आदी पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम व त्यांच्या पथकाने केली आहे.
ADVERTISEMENT