आपली मुलगी अपशकुनी असल्याचा समज करुन घेत तिचा जन्मापासून छळ करुन तिच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेवल्या आई-वडिलांविरोधात जळगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कनीज फातिमा शेख जावेद अख्तर असं मृत्यू पावलेल्या अल्पवयीन मुलीचं नाव असून या प्रकरणात कनीजचे वडील जावेद अख्तर आणि नाजिया परविन यांच्याविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. जळगाव शहरातील रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पिंप्राळा-हुडको भागात ही घटना घडली आहे.
ADVERTISEMENT
नागपूर : पशुखाद्याच्या आड मद्यतस्करी करणारे आरोपी ताब्यात
काय आहे नेमकं प्रकरण?
जावेद अख्तर हा व्यवसायाने केमिस्ट आहे. अख्तर कुटुंब हे उच्चशिक्षत असून जावेदचा एक भाऊ पेशाने डॉक्टर तर एक भाऊ वकील आहे. कनीजचा जन्म झाला त्यावेळी तिच्या आजीचं निधन झालं. यानंतर दोन वर्षांनी जावेदच्या मेडीकल दुकानाला आग लागली. या दोन्ही घटनांमुळे आपली मुलगी अपशकुनी असल्याचा समज जावेदच्या मनात तयार झाला होता.
यानंतर जावेद आपल्या मुलीचा तिरस्कार करायला लागला. छोट्या-छोट्या गोष्टींवरुन तिला मारहाण करणं, डांबून ठेवणं, जेवायला न देणं असे प्रकार करुन जावेद आपल्याच मुलीचा छळ करत होता. कनीजच्या आजी-आजोबांना याविषयी समजल्यानंतर त्यांनी आपल्या नातीला आजोळी अमळनेरला आणलं.
RFO दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी अत्यंत मोठी कारवाई, मुख्य वनसंरक्षक रेड्डीला अटक
यानंतर पुढची २-३ वर्ष कनीज आपल्या आजोळी आजी-आजोबांसोबत राहत होती. परंतू जावेदने आपल्या मुलीला भेटण्याचा बहाणा करत परत आपल्या घरी आणलं. यानंतर पुढची काही वर्ष कनीज परत आपल्या आई-वडिलांसोबत राहत होती. दरम्यानच्या काळात जावेदने परत आपल्या मुलीचा छळ सुरु केला. जावेद आपल्या मुलीला आंघोळ करु देत नव्हता ज्यामुळे तिला अनेक शाररिक व्याधी जडल्या होत्या. या छळामुळे लहानग्या कनीजचे प्राण गेल्यानंतर आई-वडिलांनी तिच्यावर तात्काळ अंत्यस्स्कार करुन तिचा मृतदेह दफन केला. परंतू कनीजच्या मामाने याप्रकरणी पोलीसांत तक्रार दाखल केल्यानंतर यामागचं सत्य समोर आलं आहे. सध्या पोलीस घटनेची सखोल चौकशी करत आहेत.
ADVERTISEMENT