पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांना अटक करण्यात आली होती, अशी माहिती आता समोर आली आहे. विजय शेखर शर्मा यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणात त्यांना जामीन मिळाल्यानंतर सोडण्यात आलं. गेल्या महिन्यात म्हणजेच २२ फेब्रुवारी रोजी घडलेली ही घटना आता समोर आली आहे.
ADVERTISEMENT
पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा हे जगुआर लँड रोव्हर कारने जात होते. यावेळी दिल्लीतील मदर इंटरनॅशनल शाळेसमोर त्यांनी पोलीस उपायुक्तांच्या कारलाच जोराची धडक दिली होती. या प्रकरणात त्यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली होती.
मिळालेल्या माहितीनुसार पोलीस उपायुक्तांचा चालक कार घेऊन दीपक अरविंदो मार्गावरील पेट्रोल पंपवर इंधन भरण्यासाठी गेला होता. त्यावेळीच हा अपघात झाला होता. घटनेनंतर विजय शेखर शर्मा कारसह फरार झाले होते. मात्र, पोलीस उपायुक्तांच्या चालकाने शर्मा यांच्या कारचा नंबर लिहून घेतला होता.
त्यांतर पोलीस उपायुक्तांच्या सूचनेनुसार चालक दीपकने मालवीय नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी भादंवि कलम २७९ नुसार गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. नंबरवरून कार गुरुग्राममधील कंपनीची असल्याची माहिती तपासातून समोर आली.
त्यानंतर पोलिसांनी कंपनीतील लोकांना घटनेबद्दल विचारलं. ही कार जीके-२मध्ये राहत असलेल्या विजय शेखर शर्मा यांची ही कार असल्याचं चौकशीतून समोर आलं. त्यानंतर शर्मा यांना अटक करण्यात आलं. मात्र, त्यानंतर त्यांना जामीन मिळाल्यानं सोडण्यात आलं.
ADVERTISEMENT