एका भयंकर बॉम्बस्फोटाने शुक्रवारी पाकिस्तान हादरले. पेशावरमधील एका मशिदीमध्ये शुक्रवारची नमाज अदा केली जात असतानाच हा स्फोट घडला. ज्यात ३० नागरिक मरण पावल्याची प्राथमिक माहिती असून, ५० पेक्षा अधिक नागरिक जखमी झाले आहेत.
ADVERTISEMENT
पेशावर शहरातील कूचा-ए-रसलदार भागातील किस्सा ख्वानी बाजार परिसरात असलेल्या शिया मशिदीत शुक्रवारी भीषण बॉम्बस्फोट झाला. स्फोट झाल्याची माहिती मिळाल्यानंतर मदत व बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. या स्फोटात ३० जण ठार झाले आहे. जखमींना नागरिकांना शहरातील लेडी रिडींग हॉस्पिटलमध्ये भरती केलं जात आहे. रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार जखमींबरोबरच ३० मृतदेह रुग्णालयात आणण्यात आले असल्याचं सांगितलं.
खैबर पख्तुनवा प्रशासनाचे प्रवक्ते बॅरिस्टर मोहम्मद अली सैफ यांनी सांगितलं की, जवळपास ३० लोक या स्फोटात मरण पावले आहेत. हा आत्मघाती बॉम्बस्फोट होता. या घटनेत दोन दहशतवाद्यांचा सहभाग होता.
पेशावर शहर पोलिसांनीही या स्फोटाबद्दलची माहिती दिली. पेशावरचे शहर पोलीस अधिकारी एजाज एहसान म्हणाले, ‘या स्फोटात एका पोलीस कर्मचाऱ्यांचाही मृत्यू झाला आहे. दोन हल्लेखोरांनी किस्सा ख्वानी बाजार मशिदीत शिरण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी तिथे सुरक्षेसाठी असलेल्या पोलिसांवर गोळीबार केला. यात एका पोलिसाचा मृत्यू झाला, तर दुसरा पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. या गोळीबारानंतर मशिदीत स्फोट झाला,” असं एहसान म्हणाले.
पोलीस अधिकारी वाहिद खान यांनी एपी वृत्तसंस्थेला सांगितलं की, ‘नागरिक नमाजसाठी कूचा-ए-रसलदार मशिदीत जमा झाल्यानंतर स्फोट घडवून आणण्यात आला.’ आतापर्यंत या हल्ल्याची कोणत्याही संघटनेनं जबाबदारी घेतलेली नाही.
शयन हैदर या प्रत्यक्षदर्शीने सांगितलं की तो मशिदीत जाण्यासाठी तयारी करत होता. त्याचवेळी स्फोट झाला. स्फोटामुळे तो रस्त्यावर फेकला गेला. या स्फोटानंतर जेव्हा त्याने डोळे उघडले, त्यावेळी त्याला फक्त धूळीचे लोट आणि मृतदेह पडलेले दिसले.
भयंकर स्फोटाने तीन मजली इमारत जमीनदोस्त; ८ जणांचा जागीच मृत्यू
रुग्णालयाच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे हल्ल्यात जखमी झालेल्यांना लेडी रिडींग रुग्णालयात दाखल केलं जात असून, रुग्णालयात धावपळी उडाली आहे. रुग्णालय प्रशासनाचाही गोंधळ उडाला असून, रुग्णालयात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. जखमींवर उपचार करण्यासाठी दुसऱ्या रुग्णालयातून डॉक्टरांना बोलवण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT