ADVERTISEMENT
मागील वर्षी कोरोनाचं (Corona) संकट लक्षात घेऊन लालबाग मंडळाने राजाची प्राणप्रतिष्ठापना केली नव्हती. मात्र, यंदा पुन्हा एका राजा लालबागमध्ये विराजमान होणार आहे. त्याची सुरुवात आता पाद्यपूजन सोहळ्याने करण्यात आली आहे.
दरवर्षी लालबागच्या राजाची मूर्ती ही भली मोठी असते. मात्र, यंदा लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळ हा शासन नियमानुसार हा उत्सव साजरा करणार असून, यावर्षी बाप्पाची मूर्ती ही फक्त चार फुटांची असणार आहे.
जगभरातील गणेशभक्त ज्या लालबागच्या राजाचा चरणी लीन होतात त्याच बाप्पाच्या पाद्यपूजनाचा सोहळा आज (10 ऑगस्ट) पहाटे सहा वाजता पार पडला. कोव्हिड-19 संसर्ग निर्बंधांमुळे अत्यंत साधेपणाने आणि सुरक्षितपणे हा पाद्यपूजन सोहळा संपन्न झाला.
यंदा गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय लालबाग मंडळाने घेतला आहे. यावेळी शासनाचे सर्व नियम व अटी पाळून उत्सव साजरा केला जाईल असं मंडळाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा पाद्य पूजन सोहळ्याची तारीख जाहीर न करताच हा सोहळा आटोपला आहे. त्यामुळे गणेशभक्तांची होणारी गर्दी टाळता आली. दरवर्षी लालबागच्या राजाच्या पाद्य पूजनालाही गणेशभक्तांची मोठी गर्दी होते. यंदा मात्र कोरोना ससंर्ग निर्बंध आणि नियमांमुळे मंडळाने गर्दी टाळण्यासाठी ही खबरदारी घेतली होती.
यंदा आपल्या लाडक्या लालबागच्या राजाचं दर्शन भाविकांना ऑनलाइन पद्धतीने घेता येणार आहे. शासन नियमाप्रमाणे लालबागच्या राजाची मूर्ती ही चार फुटाचीच असणार आहे. याशिवाय मंडळाकडून गणेशोत्सव साजरा करण्यातबाबत आता विशिष्ट पद्धतीने आखणी करण्यात येत आहे.
लालबागच्या राजाचा यावर्षीचा 88वा गणेशोत्सव यंदा मंडळातर्फे शुक्रवार दि. 10 सप्टेंबर 2021 ते रविवार दि. 19 सप्टेंबर 2021 या कालावधीत साजरा होणार आहे.
दरवर्षी लालबागच्या राजाच्या दर्शनाला लाखोंची गर्दी उसळते. त्यामुळे आता हा उत्सव साजरा करताना मंडळावर कोरोना नियमांचं पालन करण्याचं मोठं आव्हान असणार आहे
पाहा मुंबई तकचा खास व्हीडिओ
ADVERTISEMENT