कोरोनाग्रस्त रुग्णाला कोविड सेंटरमध्ये बेड मिळवून देत त्याच्यावर उपचार करण्यासाठी १ लाख रुपये मागणाऱ्या तीन डॉक्टरांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ५४ वर्षीय सुरेखा वाबळे यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर ऑक्सिजनची पातळी खाली घसरत गेली. वाबळे यांच्या कुटुंबानी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी वणवण केली. अखेरीस पद्मजा रुग्णालयातील डॉक्टर सचिन कसबे आणि डॉक्टर प्रशांत राळे यांच्याशी वाबळे यांच्या कुटुंबियांनी संपर्क साधला.
ADVERTISEMENT
PUNE: वडील मोजत होते अखेरच्या घटका, पण डॉक्टरने आपलं कर्तव्य सोडलं नाही; पुण्यातील हृदयस्पर्शी घटना
यावेळी डॉक्टरांनी वाबळे कुटुंबाला, “सध्या शहरात सर्व रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता आहे. तुमचा रुग्ण खासगी रुग्णालयात असून त्याच्यावर उपचारासाठी लाखो रुपये खर्च येऊ शकतो. तुमच्या पेशंटला आम्ही महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये दाखल करतो. त्या कोविड सेंटरमध्ये सर्व सोयी-सुविधा आहेत आणि तिकडे तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही याकरता १ लाख रुपये द्यावी लागतील”, असं सांगितलं. वाबळे कुटुंबानेही डॉक्टरांवर विश्वास ठेवत सहमतीने १ लाख रुपये देण्याची तयारी दाखवली. पैसे हातात येताच कसबे आणि राळे या डॉक्टरांनी कोविड सेंटरचे प्रमुख डॉ. प्रवीण जाधव यांना संपर्क साधला.
डॉ. जाधव यांच्याशी बोलून झाल्यानंतर सुरेखा वाबळे यांना २३ एप्रिल रोजी कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं. परंतू उपचारादरम्यान २८ एप्रिलरोजी वाबळे यांचं निधन झालं. परंतू ज्यावेळी सुरेखा वाबळे यांचा मृतदेह त्यांच्या कुटुंबियांना ताब्यात मिळाला, त्यावेळी त्यांच्या अंगावरील काही दागिने गायब झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं. वाबळे कुटुंबाने स्थानिक लोकप्रतिनीधींच्या सहाय्याने महापालिका आयुक्त राजेश पाटील आणि पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्याकडे लेखी तक्रार दिली. महापालिकेतर्फे या प्रकरणाची चौकशी केली असता सर्व सत्य समोर आलं. ज्यानंतर पिंपरी पोलीस ठाण्यात तिन्ही डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
बहुरुपी बनून शिक्षक करतोय लसीकरणाबाबत जनजागृती
ज्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत डॉ. कसबे, राळे आणि जाधव यांना अटक केली असून न्यायालयासमोर हजर केलं. न्यायालयाने ६ मे पर्यंत त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यावेळी पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी नागरिकांना कोणत्याही हॉस्पिटलमध्ये कर्मचारी जर तुम्हाला चुकीची माहिती देत असतील तर थेट त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार नोंदवा असं आवाहन केलं आहे.
ADVERTISEMENT