चीनमध्ये २०१० नंतर सर्वात भीषण विमान दुर्घटना घडली आहे. चायना ईस्टर्न एअरलाईन्सचे बोईंग ७३७ हे प्रवासी विमान जंगलात कोसळलं. दुर्घटनेनंतर विमानाने पेट घेतला. यामुळे घटनास्थळाच्या आजूबाजीचं जंगलही आगीच्या भक्ष्यस्थानी सापडलं. या विमान दुर्घटनेची काही दृश्ये आता समोर आली आहेत. ही दृश्ये बोईंग ७३७ विमानाची असल्याचा दावा केला जात आहे.
ADVERTISEMENT
चायना ईस्टर्न एअरलाईन्सचे बोईंग ७३७ हे प्रवासी विमान १२३ प्रवाशांना घेऊन जात होते. विमानात ९ कर्मचारी होते. चीनच्या नागरी आणि उड्डाण मंत्रालयाकडूनही या घटनेला दुजोरा दिला असून, सोशल मीडिया हॅण्डलवर काही व्हिडीओ पोस्ट करण्यात आले आहेत. हे व्हिडीओ चायना ईस्टर्न एअरलाईन्सच्या बोईंग विमानाच्या दुर्घटनेवेळचे असल्याचा दावा करण्यात आला आहे.
विमान दुर्घटनेचं वृत्त समोर आल्यानंतर एक व्हिडीओ समोर आला होता. ज्यात जंगलातील एका भागातून धुराचे मोठंमोठे लोट उडताना दिसत आहे. विमान दुर्घटनेनंतर त्याठिकाणी आग लागली आणि त्याचाच धूर असल्याचा दावा करण्यात आला.
चीनमधील गौंगझीच्या परिसरात दुर्घटनाग्रस्त झालेल्या विमानानंतर लागलेल्या भीषण आगीबद्दलचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात विमान दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर आग लागली. ही आग जंगलातही पसरल्याचं दिसत आहे.
चीन एव्हिशन रिव्ह्यू या ट्विटवर हॅण्डलवरून बोईंग ७३७ विमान कोसळल्यानंतरचे काही व्हिडीओ ट्विट करण्यात आलेले आहेत. यात विमान कोसळताना सीसीटीव्हीत कैद झाल्याचाही व्हिडीओ आहे. विमान जंगलात कोसळताना दिसत आहे.
दुसरा एक व्हिडीओ रस्त्यावरील वाहनातून शूट करण्यात आलेला आहे. हा व्हिडीओ विमान कोसळतानाचा असल्याचं म्हटलं जात आहे. विमान उंचावरून खाली जंगलात कोसळताना यात दिसत आहे. त्याचबरोबर एक व्हिडीओ विमान दुर्घटनाग्रस्त झालेल्या ठिकाणाचा आहे.
बोईंग ७३७ हे विमान चीनच्या दक्षिण पश्चिमेकडील युन्नान प्रांतातील कुनमिंग शहरातील शांगशुई विमानतळावरून स्थानिक प्रमाणवेळेनुसार १.१५ वाजता गौंगझाईच्या दिशेनं झेपावलं होतं. तीन वाजेपर्यंत हे विमान गौंगडोई प्रांतातील गौंगझाई येथे पोहोचणार होतं. मात्र, त्यापूर्वीच विमानाला अपघात झाला आणि ते जंगलात कोसळलं.
दुर्घटनाग्रस्त झालेलं विमान साडेसहा वर्षांपूर्वीच सेवेत दाखल झालेलं होतं. जून २०१५ मध्ये चायना ईस्टर्न एअरलाईन्सने हे विमान खरेदी केलं होतं. MU5735 विमानात १६२ आसन असून, यात १२ बिझनेस क्लास आणि १५० इकोनॉमी क्लासमधील होती. या दुर्घटनेत किती जणांचा मृत्यू झाला वा किती जखमी झाले, त्याचबरोबर विमान कोसळण्याच्या कारणाबद्दल अद्याप माहिती देण्यात आलेली नाही.
ADVERTISEMENT