“मोदी रॉकेट, फडणवीस बॉम्ब तर उद्धव ठाकरेंची शिवसेना फुसका फटाका”; दानवेंची तुफान फटकेबाजी

मुंबई तक

27 Oct 2022 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:41 AM)

दिवाळीचा पाडवा आणि भाऊबीज हा सण बुधवारी राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा झाला. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनीही त्यांच्या जालना येथील घरी कुटुंबीयांसह आनंदात दिवाळी साजरी केली. यावेळी दिवाळीनिमित्त रावसाहेब दानवे यांनी तुफान फटकेबाजी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांनी रॉकेटची उपमा दिली आहे तर देवेंद्र फडणवीस आयटम बॉम्ब असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. काय म्हटलं आहे […]

Mumbaitak
follow google news

दिवाळीचा पाडवा आणि भाऊबीज हा सण बुधवारी राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा झाला. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनीही त्यांच्या जालना येथील घरी कुटुंबीयांसह आनंदात दिवाळी साजरी केली. यावेळी दिवाळीनिमित्त रावसाहेब दानवे यांनी तुफान फटकेबाजी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांनी रॉकेटची उपमा दिली आहे तर देवेंद्र फडणवीस आयटम बॉम्ब असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

काय म्हटलं आहे रावसाहेब दानवेंनी?

रावसाहेब दानवे यांना कुणाला कुठल्या फटाक्याची उपमा द्याल असं विचारलं असता ते म्हणाले की आमचे नेते नरेंद्र मोदी हे रॉकेट आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बॉम्ब आहेत. रॉकेट आणि बॉम्ब राज्यात कुणाकडेही नाही ते फक्त भाजपकडे आहेत. बाकी राज्यातल्या इतर पक्षांमध्ये लवंगी फटाके बरेच आहेत. खाकी फटाका कुणाला म्हणाल? या प्रश्नावर त्यांनी शरद पवार असं उत्तर दिलं. तर फुसका बार कुणाला म्हणाल? असं विचारलं असता त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचं नाव घेतलं. राज ठाकरेंच्या मनसे या पक्षाला त्यांनी फटाक्यांच्या लडीची उपमा दिली. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत रावसाहेब दानवे बोलत होते.

उद्धव ठाकरेंची शिवसेना फुसका बार का?

उद्धव ठाकरेंची शिवसेना फुसका बार का? असा प्रश्न विचारला असता अडीच वर्षे ते सत्तेत होते. मात्र त्यांचा काहीही आवाजच आला नाही. आता आमचं सरकार आलं आहे. त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांना मदत केली. शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले. अडीच वर्षे जे सत्तेत होते ती अडीच वर्षे वाया गेली. त्यामुळेच मी त्यांना फुसका फटाका म्हणतो आहे. तुम्ही उद्धव ठाकरेंना फुसका फटाका म्हणाल का? असं विचारलं असता मी पक्षाबाबत बोललो आहे. पक्षाविषयी मी हे वक्तव्य केलं आहे. त्यांच्या प्रमुखांबाबत मी बोललो आहे. असं उत्तर दानवे यांनी दिलं आहे.

दरवर्षीप्रमाणे रावसाहेब दानवे यांच्या जालना येथील निवासस्थानी दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तर भाऊबीजेच्या निमित्ताने त्यांच्या बहिणीने दानवे यांना औक्षण करून भावांच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि त्याला सुख, शांती आणि समृद्धीची भरभराट लाभो यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना केली.

    follow whatsapp