पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नटसम्राट आहेत असा टोला काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला आहे. राज्यसभेत मोदींची नौटंकी पाहिली. मोदींची तुलना नटसम्राट यांच्यासोबत केली तर काहीही वावगं ठरणार नाही, त्यांना नटसम्राट व्हायचं असेल तर त्यांनी खुशाल सिनेमात जावं. राज्यसभेत अश्रू ढाळणाऱ्या मोदींना राकेश टिकैत आणि शेतकऱ्यांची आसवं दिसत नाहीत का? पंतप्रधान मोदींचे अश्रू हे मगरीचे अश्रू होते मी आजवर त्यांना अनेकदा रडताना पाहिलं आहे असंही नाना पटोलेंनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंगळवारी राज्यसभेत बोलताना गुलाम नबी आझाद यांच्या कारकिर्दीचा उल्लेख करत होते. तेव्हा ते भावूक झाले, त्यांना अश्रू अनावर झाले. यारवरून आधी शिवसेना खासदार संजय राऊत, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टीका केली होती. आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही मोदींवर टीका केली आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना नटसम्राट यांच्यासोबत केली तर मुळीच वावगं ठरणार नाही. त्यांना नटसम्राट बनायचं असेल तर त्यांनी सिनेमात जावं. मोदी यांचे अश्रू हे मगरीचे अश्रू होते” अशा शब्दांमध्ये नाना पटोले यांनी टीका केली.
काय म्हणाले होते अजित पवार?
“गुलाम नबी आझाद यांच्या आठवणी सांगत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाले, असेच त्यांना शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर भावूक झालेलं पाहिलं तर आनंद होईल.”
काय म्हणाले होते संजय राऊत?
“पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काही पहिल्यांदाच भावूक झालेले नाहीत. यापूर्वी अनेकदा असे प्रकार घडले आहेत. संसदे पहिल्यांदा प्रवेश करत असतानाही ते पायऱ्यांच्या पाया पडले होते. मंगळवारी एवढं भावनिक होण्याची आवश्यकता नव्हती. देशाचे पंतप्रधान संसदेत रडतात हा प्रकारचा विक्रम आहे. आजवर ते 5 ते 7 वेळा भावूक झाले आहेत. शेतकरी आंदोलन करत आहेत, मृत्यूमुखी पडले तेव्हा मात्र त्यांचे अश्रू दिसले नाहीत.”
ADVERTISEMENT