नुसती माफी काय कामाची? मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना पीएम केअर्सच्या बेहिशेबी फंडातून मदत करा-संजय राऊत

मुंबई तक

• 06:43 AM • 21 Nov 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे मागे घेताना शेतकऱ्यांची माफी मागितली आहे. मात्र नुसती माफी काय कामाची? पीएम केअर्स फंडातून आर्थिक मदत दिली पाहिजे अशी मागणी आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. तुमच्या चुकीमुळे 700 पेक्षा जास्त शेतकरी कुटुंबाना नुकसान भोगावं लागतं आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. काय म्हणाले आहेत संजय […]

Mumbaitak
follow google news

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे मागे घेताना शेतकऱ्यांची माफी मागितली आहे. मात्र नुसती माफी काय कामाची? पीएम केअर्स फंडातून आर्थिक मदत दिली पाहिजे अशी मागणी आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. तुमच्या चुकीमुळे 700 पेक्षा जास्त शेतकरी कुटुंबाना नुकसान भोगावं लागतं आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

काय म्हणाले आहेत संजय राऊत?

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात रस्त्यापासून संसदेत आंदोलन झालं. सरकार ऐकायला तयार नव्हतं. मात्र शेतकऱ्यांनी एकजूट केली, या एकजुटीपुढे सरकार नमलं. या आंदोलनात शेतकरी मृत्यू झाले. ७०० हून अधिक शेतकऱ्यांचा जीव गेला. आता केंद्र सरकारने या कुटुंबाना मदत व्हावी अशी मागणी होत असेल त्यात गैर काय? पीएम केअर फंडात बेहिशेबी पैसे पडले आहेत. त्यातून या मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत केली गेली पाहिजे. देशाची आणि शेतकऱ्यांची नुसती माफी मागून चालणार नाही. तुम्ही जी चूक केली त्याची शिक्षा या कुटुंबाना भोगावी लागते आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना मदत केलीच पाहिजे असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

कायदे रद्द करताना काय म्हणाले होते पंतप्रधान?

‘मी आज देशवासीयांची माफी मागतो. खऱ्या मनाने आणि पवित्र ह्रदयाने सांगू इच्छितो की आमच्या तपश्चर्येत उणीव राहिली. ज्यामुळे दिव्याच्या प्रकाशाप्रमाने असलेलं सत्य आम्ही काही शेतकरी बांधवांना समजून सांगू शकलो नाही. आज गुरूनानकजींचा पवित्र प्रकाश पर्व आहे. ही वेळ कुणाला दोष देण्याचा नाही. मी देशाला हे सांगण्यासाठी आलोय की, तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या महिन्यात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात कृषी कायदे रद्द करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल.’

परदेशातील ‘या’ सेलिब्रेटींनी दिला होता शेतकरी आंदोलनाला पाठिंबा

राजकीय पक्षांनी आडमुठेपणा करू नये

एसटी कामगारांच्या संपावर अजूनही तोडगा निघाला नाही. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. परिवहन मंत्री अनिल परब यांचे प्रयत्न सुरू आहेत. ते दिवस रात्र बैठका घेत आहेत. काही संघटना आणि राजकीय पक्ष आडमुठेपणाने वागत असतील तर त्यातून अडथळे निर्माण होतात, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच घरी येतील

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीबाबत विचारलं असता, उद्धव ठाकरे यांची प्रकृती चांगली आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होते आहे. त्यांच्याशी कालच आपलं बोलणं झालं आणि ते लवकरच घरी येतील असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. उद्धव ठाकरेंवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे त्यामुळे त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच कामाला सुरूवात करावी असं सांगण्यात आल्याचंही संजय राऊत म्हणाले.

    follow whatsapp