संत तुकाराम महाराज यांचा ३७३ वा वैकुंठ आगमन बीज सोहळा ३० मार्च रोजी संपन्न होणार आहे. सध्या राज्यात कोरोना महामारीचं चित्र लक्षात घेता फक्त ५० जणांना या सोहळ्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. परंतू शासनाचा हा आदेश धुडकावून लावत वारकऱ्यांचे ज्येष्ठ नेते बंडातात्या कराडकर यांनी महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाला मोठ्या संख्येने बीज सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याचं आवाहन केलं. वारकऱ्यांसोबत देहूमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असलेल्या बंडातात्या कराडकरांना पोलिसांनी रोखलं आहे.
ADVERTISEMENT
शासनाच्या आदेशाप्रमाणे बीज सोहळ्यासाठी उपस्थित असणाऱ्या ५० लोकांच्या नावाची यादी श्री संत तुकाराम महाराज संस्थान देहूगाव यांच्याकडे पाठवण्यात आली आहे. या सोहळ्यासाठी हजर राहणाऱ्या ५० जणांच्या कोरोना चाचण्याही कार्यक्रमापूर्वी केल्या जाणार आहेत. या चाचण्यांचा अहवाल आल्यानंतरच त्यांना सोहळ्यासाठी हजर राहता येणार आहे. परंतू वारकऱ्यांना सोहळ्यासाठी उपस्थित राहता येणार नाही म्हणून आक्रमक झालेल्या बंडातात्या कराडकरांनी देहुकडे कूच केलं होतं. परंतू पोलिसांनी त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला. ज्यानंतर बंडातात्यांच्या नेतृत्वाखाली वारकऱ्यांनी देहुगावाच्या वेशीवर बसून पोलिसांविरोधात निदर्शन केली.
उस्मानाबाद जिल्ह्यात कडक निर्बंध लागू, तुळजाभवानी मंदीरही १२ तासांसाठीच सुरु
मुंबई तक शी बोलत असताना बंडातात्या कराडकरांनी आपली प्रतिक्रिया दिली. “शासनाच्या सर्व नियमांचं आम्ही पालन करायला तयार आहोत. परंतू वारकऱ्यांना बीज सोहळ्यात सहभागी करुन घ्यावं अशी आमची इच्छा आहे. देहू गावाबाहेर येऊन वारकऱ्यांना रोखलं जातं हे आम्हाला मान्य नाही.” दरम्यान बंडातात्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे देहू परिसरात मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान पोलिसांविरोधात निदर्शन करत असताना बंडातात्यांसह अनेक समर्थकांनी सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क न घालत अनेक नियमांचं उल्लंघन केलं. त्यामुळे पोलीस अधिकारी अशा वारकऱ्यांचे फोटो काढून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करणार आहेत.
ADVERTISEMENT