७ फेब्रुवारीपासून महाराष्ट्रात एक प्रकरण गाजतं आहे आणि ते आहे पूजा चव्हाणचं मृत्यू प्रकरण. पूजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड यांच्यावर काही गंभीर आरोप झाले. ज्यानंतर त्यांना राजीनामाही द्यावा लागला. आज पुण्यात पोलिसांची पत्रकार परिषद आयोजित कऱण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ताही होते. त्यांना जेव्हा पूजा चव्हाण प्रकरणात प्रश्न विचारण्यात आले तेव्हा त्यांनी त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचं सोडून हसत हसत पत्रकार परिषद सोडून जाणं पसंत केलं.
ADVERTISEMENT
नेमकं काय घडलं?
पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी या प्रकरणात आरोप झालेले मंत्री संजय राठोड यांच्याविरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे का?, पोस्टमॉर्टमचा अहवाल नेमका काय आला आहे? हे आणि यांसारखेच काही प्रश्न उपस्थित केले. या प्रश्नांना उत्तरं देण्याऐवजी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता हे या प्रश्नांना उत्तरं देण्याऐवजी उठून उभे राहिले आणि हसत हसत तिथून निघून गेले. पत्रकार त्यांना विनंती करत होते. मात्र त्यांनी पत्रकार परिषद ज्या हॉलमध्ये आयोजित करण्यात आली होती त्या हॉलमधून निघून जाणं पसंत केलं. त्यांचा हा व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
पाहा पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी हसत हसत पत्रकार परिषद कशी सोडली तो व्हीडिओ
काय आहे पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण?
पूजा चव्हाण या टिकटॉकवर फेमस असलेल्या मुलीने पुण्यात ७ फेब्रुवारीच्या रात्री इमारतीवरून उडी मारली. त्यानंतर तिला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र तिचा मृत्यू झाला. या प्रकरणात दोनच दिवसात सुमारे १२ ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या. या व्हायरल क्लिपमधला एक आवाज हा संजय राठोड यांचा आहे असा आरोप भाजपने पहिल्या दिवसापासून केला. तसंच त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी सुरू केली. संजय राठोड हे ७ फेब्रुवारीपासून नॉट रिचेबल होते.
अखेर संजय राठोड हे २३ फेब्रुवारीला मीडियासमोर आले. पोहरादेवी या ठिकाणी जाऊन त्यांनी संत सेवालाल यांच्या समाधीचं दर्शन घेतलं. त्यानंतर माझ्यावर झालेले आरोप खोटे आहेत. विरोधक माझं राजकीय करिअर उद्ध्वस्त करू पाहात आहेत असा आरोप त्यांनी केला. २४ फेब्रुवारीला ते कॅबिनेटच्या बैठकीलाही हजर होते आणि त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली.
२८ फेब्रुवारीला संजय राठोड यांचा राजीनामा
या संपूर्ण प्रकरणात आरोप झालेल्या संजय राठोड यांनी २८ फेब्रुवारीला त्यांच्या वनमंत्री पदाचा राजीनामा दिला. माझ्यावर खोटे आरोप केले जात आहेत. या प्रकरणात नाहक मला ओढलं जातं आहे. या प्रकरणात शिवसेनेची बदनामी होत असल्याने मी राजीनामा देतो आहे असा आशय असलेल्या मजकुरासह संजय राठोड यांनी राजीनामा दिला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनीही पत्रकार परिषद घेऊन संजय राठोड यांनी राजीनामा दिल्याचं स्पष्ट केलं.
ADVERTISEMENT