मुंबई: भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांना कोल्हापूर जिल्ह्यात बंदी घातल्यानंतर भाजपचे नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी देखील याप्रकरणी आपला संताप व्यक्त केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेशबंदी केलेले किरीट सोमय्या हे तालिबानी आहेत की दहशतवादी आहेत? असा सवाल प्रविण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारला केला आहे.
ADVERTISEMENT
मंत्री हसन मुश्रीफांविरोधात गंभीर आरोप केल्यानंतर किरीट सोमय्या हे काल (19 सप्टेंबर) रात्री कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाले होते. पण सातारा पोलिसांनी त्यांना कराड येथेच थांबवलं आणि कोल्हापूरमध्ये जाण्यास रोखलं. याचबाबत प्रविण दरेकर यांनी पत्रकार परिषदेत आपला संताप व्यक्त केला.
पाहा प्रविण दरेकर नेमकं काय म्हणाले:
‘किरीट सोमय्या तालिबानी किंवा दहशतवादी आहेत का?’
‘आपल्या देशात घटनेने प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार दिलेला आहे. कुठेही जाऊन तक्रार करण्याचा अधिकार दिलेला आहे. कोल्हापूर किंवा कागल तालुका काय केंद्रशासित प्रदेश आहे का? जर त्या ठिकाणी लोकशाही मार्गाने जाऊन किरीट सोमय्या हे फक्त तक्रार करणार होते. तर त्यांना अशाप्रकारे का अडवण्यात आलं?’
‘त्या तक्रारीच्या माध्यमातून योग्य-अयोग्य काय ते पोलीस खातं ठरवणार होतं. पण किरीट सोमय्यांनी जिल्ह्यातच यायचं नाही, तालुक्यातच यायचं नाही, तक्रारच करायची नाही… त्यासंदर्भात त्यांना 4-5 तास कोंडून ठेवायचं. मुंबई ते कराडपर्यंत त्यांच्या प्रवासात पोलीस फौजफाटा सोबत ठेवायचा. याचा अर्थ काय झाला… कोण आहेत ते? तालिबानी आहेत की दहशतवादी आहेत?’ असा संतप्त सवाल दरेकर यांनी उपस्थित केला.
‘हसन मुश्रीफ यांना चंद्रकांत पाटलांविषयी पोटशूळ’
‘चंद्रकांत पाटील यांच्याविषयी हसन मुश्रीफांचा जो पोटशूळ आहे तो पुन्हा एकदा बाहेर आला आहे. कदाचित या निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीने यश मिळवलं असेल परंतु चंद्रकांत पाटील हे कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष नाहीत. ते महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाराष्ट्रात दादांच्या नेतृत्वाखाली 105 आमदार सर्वाधिक असं प्रचंड यश मिळालं आहे. याविषयीचा विसर हसन मुश्रीफ यांना पडलेला असावा.’ असंही दरेकर यावेळी म्हणाले.
‘मूळ मुद्द्याला बगल देण्यासाठी सगळा खटाटोप’
‘राजकारणात प्रत्येक पक्षाच्या सीट कमी जास्त होत असतात. भाजपचा इतिहास तर 2 खासदारांपासून 300 पार करणारा आहे. त्यामुळे निवडणुका, आकडेवारी यापेक्षा सिद्धात या गोष्टीला महत्त्व देणारा आमचा पक्ष आहे. त्यामुळे मुश्रीफांनी भाजपविषयी चिंता करु नये. खरं तर मूळ मुद्द्याला बगल देण्यासाठी अशाप्रकारचे नियोजनबद्ध विषय आणण्याचा केविलवाणा आणि दुर्दैवी प्रयत्न हसन मुश्रीफ करत आहेत.’ अशी टीकाही दरेकरांनी यावेळी केली आहे.
हसन मुश्रीफांवर आणखी 100 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप; किरीट सोमय्यांचा गौप्यस्फोट
‘आग लागल्याशिवाय धूर दिसत नाही’
‘हसन मुश्रीफ आणि महाविकास आघाडीचे जे प्रयत्न चालले आहेत त्यामुळे लोकांची खात्री होत आहे की, काही तरी धुमसतंय. कारण आग लागल्याशिवाय धूर दिसत नाही. म्हणूनच किरीट सोमय्या यांच्या तक्रारीला आणखी बळकटी मिळत आहे आणि सरकारकडून करण्यात येणारी अतिरेकी कारवाई दिसून येत आहे.’ असंही दरेकर म्हणाले.
ADVERTISEMENT