पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रीमंडळ विस्तारात प्रीतम मुंडे यांचं नाव ऐनवेळी मागे पडल्यामुळे मुंडे भगिनी नाराज असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये येत होत्या. परंतू या सर्व घडामोडींवर पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिलं आहे. आम्ही मंत्रीपदाची मागणी केलेली नव्हती, त्यामुळे पक्षाच्या निर्णयावर आम्हाला कोणताही आक्षेप नसल्याचं पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं.
ADVERTISEMENT
“प्रीतम मुंडे यांनी मंत्रीपदाची अपेक्षा केलेली नव्हती, त्यामुळे नाराजीचा प्रश्नच येत नाही. मुंडे परिवाराने भाजपसाठी मोठं योगदान दिलंय. आम्ही कधीच कोणत्याही पदाची अपेक्षा केली नाही. प्रीतम तर माझ्या वडिलांच्या निधनानंतर राजकारणात आली. त्यामुळे पंकजा आणि प्रीतम मुंडे म्हणजे वंजारी समाज असं आम्ही मानत नाही. आम्ही नेतृत्व नाही तर कार्यकर्ते आहोत. नव्या मंत्र्यांना माझ्या शुभेच्छा असून त्यांनी राज्यातला ओबीसी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पावलं उचलावीत”, अशी प्रतिक्रीया पंकजा मुंडेंनी दिली.
राज्यात मुंडेंचा प्रभाव कमी करण्यासाठी प्रीतम मुंडे यांचं नाव डावलण्यात आलं का असं विचारलं असता पंकजा मुंडे यांनी, असा कोणताही प्रयत्न राज्यात होतोय असं वाटत नसल्याचं सांगितलं. मुंडेंचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न झाला तरीही तो वाढणारच असं सांगायलाही त्या विसरल्या नाहीत. भाजपत टीम नरेंद्र टीम देवेंद्र असं चालत नाही. पक्ष नेतृत्वाने घेतलेला निर्णय आम्हाला मान्य असतो असं म्हणत पंकजा मुंडेंनी नाराजीची शक्यता फेटाळून लावली.
शिवसेनेनेही ‘सामना’ अग्रलेखातून मंत्रीमंडळ विस्तारावर टीका करत, प्रीतम मुंडेंना नाकारुन कराडांना संधी देणं हा पंकजा यांना संपवण्याचा डाव असल्याचं म्हटलं आहे. परंतू मी तो अग्रलेख वाचला नाही, ते त्यांचं मत असू शकतं असं म्हणत पंकजा मुंडेंनी अधिक भाष्य करणं टाळलं. राजकारणात काम करत असताना समर्थकांच्या नेत्यांप्रती काही भावना आणि अपेक्षा असतात. त्यामुळे जे कार्यकर्ते नाराज किंवा दुखावले असतील त्यांची समजूत काढली जाईल असंही पंकजा म्हणाल्या. राजकारणात मी आश्रित नाही त्यामुळे माझं पुनर्वसन करण्याचा प्रश्नच येत नसल्याचं पंकजा मुंडेंनी स्पष्ट केलं.
हा पंकजा मुंडेंना संपूर्ण खतम करायचा डाव, Cabinet Expansion वरुन शिवसेनेने भाजपला डिवचलं
ADVERTISEMENT