पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संध्याकाळी पाच वाजता देशाच्या जनतेशी संवाद साधणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काय बोलणार याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. देशाशी संवाद साधण्याची त्यांची ही पहिली वेळ नाही. गेल्या वर्षी मार्च महिन्यात जेव्हा त्यांनी जनतेशी संवाद साधला होता तेव्हा त्यांनी एक दिवसांचा जनता कर्फ्यू आणि त्यानंतर लॉकडाऊन जाहीर केला होता. आज कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबाबत, लसींबाबत आणि इतर सगळ्या गोष्टींवर पंतप्रधान काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पंतप्रधान कार्यालयाने ट्विट करून ही माहिती दिली आहे.
ADVERTISEMENT
देशातल्या काही राज्यांमध्ये अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्याबाबत आणि आणखी काळजी कशी घ्याल.. तिसरी लाट येण्यापासून देशाला कसं वाचवाल याबाबत मोदी बोलण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे लसीकरणाबाबतही महत्त्वाच्या गोष्टी ते बोलू शकतात.
देशात कोरोनाची दुसरी लाट मंदावते आहे. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेने देशात कहर माजवला होता. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी झाल्यानंतर आता दिल्ली, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थान यांच्यासहीत अनेक राज्यांनी निर्बंध शिथील करण्यास सुरूवात केली आहे. कोरोना काळात आत्तापर्यंत मोदींनी अनेकदा राष्ट्राल संबोधन केलं आहे. मग ती संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा असो किंवा कोरोना वॉरियर्सना सलाम करणं असो किंवा आत्मनिर्भर पॅकेजची घोषणा असो वेळोवेळी मोदींनी देशाला संबोधन करून माहिती दिली आहे तसंच मार्गदर्शनही केलं आहे. आता आज संध्याकाळी पाच वाजता मोदी काय बोलणार हे पाहणं सगळ्या देशासाठी महत्त्वाचं ठरणार आहे.
काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही विभागांशी चर्चा केली आणि येत्या काळात आपल्या देशाचं धोरण काय असलं पाहिजे याबाबत त्यांची मतं जाणून घेतली. अशात लसीकरणावरून मोदी सरकारवर टीका होते आहे. लसीकरणाबाबत मोदी काही महत्त्वाची घोषणा करणार का? हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT