अंबानींच्या धमकीचं पत्र ‘त्या’ प्रिंटरवरच छापण्यात आलं होतं?

मुंबई तक

• 09:31 AM • 23 Mar 2021

मुंबई: प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया निवासस्थानाबाहेर सापडलेल्या संशयित गाडीत जिलेटीन कांड्यासह एक धमकीचं पत्र देखील सापडलं होतं. पण आता हे पत्र नेमकं कुणी छापलं होतं आणि कशावर याचा खुलासा होण्याची शक्यता आहे. कारण ATS ने मनसुख हिरेन प्रकरणात आरोपी विनायक शिंदेच्या घरातून एक प्रिंटर जप्त केला आहे. ATSच्या अधिकाऱ्यांना असा संशय आहे की, […]

Mumbaitak
follow google news

मुंबई: प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया निवासस्थानाबाहेर सापडलेल्या संशयित गाडीत जिलेटीन कांड्यासह एक धमकीचं पत्र देखील सापडलं होतं. पण आता हे पत्र नेमकं कुणी छापलं होतं आणि कशावर याचा खुलासा होण्याची शक्यता आहे. कारण ATS ने मनसुख हिरेन प्रकरणात आरोपी विनायक शिंदेच्या घरातून एक प्रिंटर जप्त केला आहे. ATSच्या अधिकाऱ्यांना असा संशय आहे की, हे पत्र याच प्रिंटरवर छापलं आहे.

हे वाचलं का?

25 फेब्रुवारीला मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया निवासस्थानाबाहेर एक स्कॉर्पिओ सापडली होती. ज्यामध्ये मुकेश अंबानी यांना धमकी देणार एक पत्रंही सापडलं होतं. हे पत्र नेमकं कुणी लिहलं होतं याबाबत एटीएसकडून तपास सुरु होता. दुसरीकडे मनसुख हिरेन हत्या प्रकरणी एटीएसने माजी पोलीस कॉन्स्टेबल विनायक शिंदे याला अटक केली होती. लखन भैय्या एन्काउंटरप्रकरणी दोषी असलेला विनायक शिंदे हा पॅरोलवर बाहेर आला होता आणि त्याच दरम्यान त्याने मनसुखची हत्या केल्याचा एटीएसला संशय आहे.

विनायक शिंदेच्या अटकेनंतर एटीएसच्या अधिकाऱ्यांनी त्याच्या कळव्यातील घरावर देखील छापा मारला. यावेळी एटीएसने त्याच्या घरातून एक प्रिंटर हस्तगत केला. त्यामुळे याच प्रिंटरवरुन धमकीचं पत्र छापण्यात आलेलं की नाही याबाबत आता सखोल तपास सुरु आहे.

विनायक शिंदेंना अटक झालेले लखन भैया एनकाऊंटर प्रकरण काय ?

‘त्या’ पत्रात नेमकं काय म्हटलं होतं?

हे पत्र मुकेश अंबनी आणि निता अंबनी यांना उद्देशून लिहिण्यात आलं आहे. ज्यामध्ये मुकेश यांना भाई आणि निता यांचा भाभी असा उल्लेख करण्यात आला आहे.

त्यात असं म्हटलं होतं की, ‘अशा तऱ्हेने संशयित कार त्यांच्या घराबाहेर पार्क करुन त्यात जिलेटीनच्या कांड्या ठेवणं ही फक्त एक झलक आहे. पुढच्या वेळेस हे या जिलेटीनच्या कांड्या कनेक्ट करुन (म्हणजे त्यापासून स्फोटक बनवूनच) गाडीतून येईल.’ पूर्ण अंबानी कुटुंबाला उडविण्याचा बेत आहे असल्याचंही या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

मुंब्रा खाडीत कसा फेकला मनसुखचा मृतदेह? ATS च्या अटकेत असलेल्या आरोपीने दिली माहिती

विनायक शिंदे उलगडणार मनसुखच्या हत्या प्रकरणात गुपित?

दरम्यान, लखन भैय्या एन्काउंटरमधील दोषी विनायक शिंदे हा पॅरोलवर असताना सचिन वाझे यांना अनेकदा भेटला होता आणि त्यांच्या बेकायदेशीर कामामध्ये मदत देखील करायचा. त्यामुळे मनसुख हिरेन याची हत्या करण्यात विनायक शिंदे याचाच सहभाग असल्याचा एटीएसला संशय आहे. त्यामुळे आता त्याच्या अटकेनंतर या हत्या प्रकरणातील सत्य समोर येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मनसुख हिरेन प्रकरणात नरेश गोर आणि विनायक शिंदे या दोघांनाही ठाणे कोर्टाने 30 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे या दोघांकडून एटीएसचे अधिकारी हत्या प्रकरणातील संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

    follow whatsapp