पुणे: पुण्यात एका विवाहित व्यक्तीला आपल्या गर्लफ्रेंडसोबत हॉटेलमध्ये राहणं चांगलंच महागात पडलं आहे. वास्तविक, हॉटेलमध्ये गर्लफ्रेंडसोबत चेक-इन करण्यासाठी विवाहित तरुणाने चक्क पत्नीचे आधारकार्ड वापरलं. पण आता या सगळ्या प्रकरणात तो वाईटरित्या अडकला आहे. कारण पत्नीने केलेल्या तक्रारीवरून आता पती आणि त्याच्या गर्लफ्रेंडविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
मंगळवारी पुण्यातील हिंजवडी पोलीस ठाण्यात आरोपी आणि त्याच्या गर्लफ्रेंडविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपी हा गुजरातचा व्यापारी असून त्याची पत्नी ही एका कंपनीत संचालक आहे.
अधिकृत माहितीनुसार, पत्नीने पतीच्या एसयूव्हीमध्ये जीपीएस बसवले होते. त्यामुळे पती कुठे जातोय याची सगळी माहिती तिला मिळत होती. यामुळेच तिला पती आपली फसवणूक करत असल्याचंही समजलं. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये आरोपीने त्याच्या पत्नीला सांगितले की तो व्यवसायानिमित्त बंगळुरूला जात आहे. पण पत्नीला पतीचा संशय आल्याने तिने आपल्या पतीच्या कारचं जीपीएस लोकेशन तपासलं. त्यावेळी तिला आढळून आलं की, पतीची कार बंगळुरु नव्हे तर पुण्यात आहे.
पत्नीने मिळवलं सीसीटीव्ही फुटेज
पोलिसांनी सांगितले की, व्यावसायिकाच्या पत्नीला याचा संशय आल्याने तिने संबंधित हॉटेलशी संपर्क साधला. यावेळी हा व्यक्ती आपल्या पत्नीसह हॉटेलमध्ये आला असल्याची माहिती हॉटेल कर्मचाऱ्यांनी दिली. त्यामुळे पत्नीने हॉटेलेचं सीसीटीव्ही फुटेज मिळवलं.
तेव्हा तिला असं समजलं की, पतीने तिचं आधार कार्ड वापरून हॉटेलमध्ये दुसऱ्या महिलेसोबत चेक इन केलं आहे. ही गोष्ट समजताच पत्नीला धक्का बसला. तिला पतीबाबत आधीपासूनच संशय होता. मात्र, तिच्या आधारकार्डचा वापर करुन पती असं काही करेल अशी तिला साधी शंकाही आली नव्हती. त्यामुळेच तिने या प्रकरणी पोलिसात धाव घेतील. या संपूर्ण प्रकरणात पतीला कठोर शासन व्हावं अशी मागणी त्याच्या पत्नीने केली आहे.
Mumbai: 25 वर्षीय तरुणासोबत विवाहित महिलेचे अनैतिक संबंध, तरुणाने अश्लील Video पाठवला थेट पतीला
पती आणि त्याची गर्लफ्रेंड फरार
पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार महिलेचा पती आणि त्याच्या गर्लफ्रेंडविरुद्ध कलम 419 (फसवणूक) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र ते दोघेही सध्या फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. पुणे पोलीस दोघांनाही शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र अद्याप तरी त्यांना शोध लागलेला नाही.
ADVERTISEMENT