मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारख्या हुबेहुब दिसणाऱ्या व्यक्तीवर पोलिसांनी कारवाई केली आहे. विजय नंदकुमार माने असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखी वेशभूषा व पोशाख परिधान करून सराईत गुन्हेगार शरद मोहोळ त्याच्यासोबत फोटो काढून त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केले होते. याप्रकरणी पुण्यातील बंडगार्डन पोलिस ठाण्यात त्याच्या विरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
खंडणी विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मोहन जाधव यांनी याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. याबाबत फिर्यादीमध्ये म्हटल्याप्रमाणे अधिक माहिती अशी की, संशयित आरोपी विजयकुमार माने हा नियमित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखी वेशभुषा करुन समाजात वेगवेगळ्या कार्यक्रमात आणि सर्व सार्वजनिक ठिकाणी जाऊन लोकांचा गैरसमज व्हावा, अशा पद्धतीने वावरत होता.
दरम्यान, सोमवारी फिर्यादी मोहन जाधव हे बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखी वेशभुषा आणि पोषाख परिधान करणाऱ्या विजय माने याने सराईत गुन्हेगार शरद मोहोळ याच्यासोबत फोटो काढून तो सोशल मीडियावर व्हायरल केला असल्याची माहिती त्यांना मिळाली. तसेच फोटोतील व्यक्ती मुख्यमंत्रीच आहेत अशी दिशाभूल करत असल्याची गोष्टही नजरेस आली.
त्यानुसार खंडणी विरोधी पथक दोनच्या पथकाने माहिती घेतली असता पोलिसांना एक फोटो मिळाला. फोटो पाहिल्यानंतर सुरुवातीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उभे असून सराईत गुन्हेगार शरद मोहोळ हा खुर्चीत बसला आहे, असे चित्र उभे करण्यात आले असल्याचे दिसून आले.
यातुन आरोपीने जाणीवपूर्वक नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. तसेच मुख्यमंत्री शिंदे यांची समाजातील प्रतिमा मलिन करण्यासाठी सराईत गुन्हेगारासोबतचा फोटो सोशल मिडीयात व्हायरल करुन गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केल्याचेही फिर्यादीत नमूद केले आहे. यानंतर विजय माने विरोधात IPC 419-511, 469, 500, 501 माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये पुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत पुढील तपास बंडगार्डन पोलीस करीत आहेत.
ADVERTISEMENT