पुणे: शिवसेना आमदार आणि माजी मंत्री संजय राठोड यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. कारण 22 वर्षीय पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी पुणे पोलिसांना काही कॉल रेकॉर्डिंग सापडले आहेत. ज्यामुळे संजय राठोड यांचा पाय अधिकच खोलात गेला आहे. दरम्यान, याच प्रकरणामुळे संजय राठोड यांना आपलं मंत्रिपद गमवावं लागलं होतं.
ADVERTISEMENT
गेल्या काही महिन्यांपासून पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरु आहे. ज्यामध्ये आता पुणे पोलिसांच्या हाती काही अत्यंत महत्त्वाचे पुरावे लागले आहेत.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पुणे पोलिसांना पूजा चव्हाण आणि माजी मंत्री संजय राठोड यांच्यात फोनवरुन जे संभाषण झालं होतं त्याच्या अनेक रेकॉर्डिंग सापडल्या आहेत. या रेकॉर्डिंगमध्ये त्यांचा एक कॉल हा तब्बल 90 मिनिटांपर्यंत सुरु होता. जो पूजा चव्हाण हिच्या आत्महत्या करण्याच्या चार ते पाच दिवसांपूर्वीचा होता. अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
पूजाने 7 फेब्रुवारी 2021 रोजी पुण्यात राहत असलेल्या इमारतीतून उडी मारुन आत्महत्या केली होती. ज्यानंतर दोन दिवसांनी काही फोन कॉल रेकॉर्डिंग हे सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि त्यानंतर विरोधी पक्षाने याप्रकरणी आवाज उठवत सरकारवर जोरदार टीका केली. अखेर याचप्रकरणी दबाव वाढल्याने संजय राठोड यांना 28 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राच्या वनमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
‘पोलिसांना जे फोन रेकॉर्डिंग मिळाले आहेत. त्याआधारे प्रथमदर्शनी पूजासोबत बोलणारी व्यक्ती ही संजय राठोड हेच असावेत असा संशय आहे. पूजाने त्यांचे सर्व संभाषण रेकॉर्ड केले होते. हे सर्व संभाषण बंजारा भाषेत झाले होते. सध्या त्यांच्या सर्व कॉल रेकॉर्डिंगचे भाषांतर केले जात आहेत.’ अशी माहिती एका पोलीस सूत्राने ‘द इंडियन एक्सप्रेस’ या इंग्रजी दैनिकाला दिली आहे.
पूजा ही मूळची बीड जिल्ह्याची होती. पण ती शिक्षणासाठी पुण्यात आली होती. दरम्यान, पूजा आणि संजय राठोड यांचे अत्यंत जवळचे संबंध होते अशीही चर्चा होती. सूत्रांनी सांगितले की, पूजाचा मोबाईल फोन ज्यात राठोड यांच्याशी तिच्या कथित संभाषणाचे रेकॉर्डिंग आहे. ज्याचा डेटा मिळविण्यासाठी तिचा फोन हा पुण्यातील फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (FSL) ला पाठवण्यात आला होता.
दरम्यान, पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येच्यापूर्वी 24 तास आधीचे म्हणजे 6 फेब्रुवारी 2021 रोजी यवतमाळमधील वैद्यकीय महाविद्यालयातील सीसीटीव्ही फुटेजही लॅबमध्ये पाठविण्यात आलं आहे. कारण त्याच दिवशी यवतमाळमधील मेडिकल कॉलेजमधील रुग्णालयात पूजा अरुण राठोड नावाच्या मुलीचा गर्भपात करण्यात आला होता. पण ही तरुणी पूजा राठोड नव्हे तर पूजा चव्हाण असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
पुण्यामध्ये पूजा संजय राठोड यांचा एका जवळचा कार्यकर्ता अरुण राठोड याच्यासोबत राहत होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यवतमाळमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये अरुण राठोड याच्यासह पूजा हिच्या कथित प्रतिमा दिसत आहेत.
BLOG : ‘सामना’तला मारूती कांबळे आणि वास्तवातली पूजा चव्हाण
पूजाच्या फोनचं एफएसएल अहवाल आणि यवतमाळमधील वैद्यकीय महाविद्यालयातील सीसीटीव्ही फुटेज गेल्या महिन्यात पोलिसांना मिळाल्याचे समजते आहे. परंतु त्यांनी अद्याप प्रयोगशाळेला संजय राठोड यांच्या आवाजाच्या नमुन्यांविरुद्ध तपासण्यास सांगितलेले नसल्याचे समजते आहे. पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज अस्सल असल्याची पुष्टीही मिळाली आहे, अशीही सूत्रांनी माहिती दिली आहे.
पूजाच्या मृत्यूनंतर, यवतमाळ रुग्णालयाने एक निवेदन जारी केले होते की, एक पूजा अरुण राठोड 6 फेब्रुवारी रोजी पहाटे 4.34 वाजता येथे दाखल झाली होती आणि तिचा गर्भपात झाला होता.
दरम्यान, या सगळ्या प्रकरणात आता संजय राठोड यांच्यावर पोलीस नेमकी काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT