पुणे शहरात पुन्हा एकदा पावसानं हैदोस घातला. सोमवारी रात्री झालेल्या पावसानं काही तासांतच पुणे शहर जलमय झालं. एरवी वाहनांची गर्दी असणारे पुण्यातले रस्ते पावसाच्या पाण्यामुळे भरून वाहत होते. शहरातल्या अनेक भागातले पाण्याचे धडकी व्हिडीओ आता समोर आले आहेत.
ADVERTISEMENT
पुणे शहराला सोमवारी रात्री पावसानं अक्षरशः झोडपून काढलं. रात्री बारापर्यंत सुरू असलेल्या पावसानं पुण्यातले रस्ते पाण्याखाली गेले, तर अनेक भागात घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पावसाचं पाणी शिरल्यानं नागरिकांची तारांबळ उडाली.
पुणे शहरातील येवलेवाडी स्मशानभूमी परिसरात, सुखसागरनगर, अंबामाता मंदिर, कोंढवा खुर्द, एनआयबीएम रोड, रास्ता पेठ, दारुवाला पुलाजवळ-सुखसागर नगर, डॉल्फिन चौक, बी. टी. कवडे रोड अग्निशमन केंद्र समोर, हडपसर, गाडीतळ, शिवाजीनगर पोलीस मुख्यालय या भागातील रस्ते पाण्याखाली गेले होते.
त्याबरोबरच मंगळवार पेठ, शिवाजी स्टेडियम, कसबा पेठ, फिश मार्केट जवळ, कुंभारवाड्यासमोर, नारायण पेठ, मोदी गणपती, औंध, डीएव्ही स्कुल गल्ली, कसबा पेठ, पवळे चौक, कसबा पेठ, भुतडा निवास-पर्वती, मित्रमंडळ चौक, गंज पेठ, भवानी पेठ या भागात राहणार्या नागरिकांचे जोरदार पावसामुळे प्रचंड हाल झाले.
रस्त्यावरून वाहनं वाहिली…
पुणे शहरात अचानक झालेल्या पावसामुळे रस्त्यांवरून वाहणाऱ्या पाण्याचा जोर खूपच होता. अनेक ठिकाणी दुचाकी वाहनं वाहून जाताना दिसली. तर काही ठिकाणी चारचाकी गाड्याही पाण्याच्या प्रवाहात वाहून जातानाचे व्हिडीओ समोर आलेत.
सोशल मीडियावर पुणे शहरातल्या विविध भागातले पावसाचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत. यात रस्त्यावरून वाहणारे पाणी पाहून अनेकांनी चिंता व्यक्त केलीये.
मुसळधार पावसामुळे पुण्यातल्या बहुसंख्य भागात प्रचंड पाणी साचल्यानं पुण्यातल्या पायाभूत सुविधावरही आता प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. व्हिडीओ शेअर करत लोक महापालिकेच्या कारभारावर टीका करताना दिसताहेत.
गेल्या पाच वर्षात पुणे महापालिकेत भाजपची सत्ता होती. त्यामुळे पावसामुळे पुणे जलमय झाल्यानंतर आता भाजप आणि भाजपच्या नेत्यांनाही सोशल मीडियावरून लोक प्रश्न विचारताना दिसत आहेत.
ADVERTISEMENT