महात्मा गांधींविरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे चर्चेत आलेल्या कालीचरण महाराजला पुणे कोर्टाने एका प्रकरणात दिलासा दिला आहे. १९ डिसेंबर रोजी पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात कालीचरण महाराजाने अशाच प्रकारचं एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्याप्रकरणी पुणे पोलिसांनी कालीचरण महाराजला अटक केल्यानंतर त्याला गुरुवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आलं.
ADVERTISEMENT
यावेळी झालेल्या सुनावणीच कालीचरण महाराजला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर वकीलांनी लगेच जामिनासाठी अर्ज दिला. न्यायालयानेही २५ हजाराच्या जातमुचलक्यावर कालीचरण महाराजला हा जामीन मंजूर केला आहे.
कालीचरण महाराज याच्या वादग्रस्त विधानाबाबत गुरुवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. रामदिन यांच्या न्यायालयात जामीना करिता अर्ज केला होता. बचाव पक्षाकडून अमोल डांगे यांनी हा अर्ज सादर केला. त्यावर सरकार पक्षाकडून सरकारी वकील श्रीधर जावळे यांनी लेखी म्हणणे सादर केले.
आरोपीचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. आरोपीला जामीन झाल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. तसेच या प्रकरणातील अन्य आरोपी फरार आहेत. कालीचरणला जामीन झाल्यास या आरोपींना मदत होईल. त्यामुळे कालीचरण याला जामीन नाकारण्यात यावा, अशी मागणी न्यायालयामध्ये करण्यात आली. त्यानंतर न्यायालयाने 25 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला आहे.
ADVERTISEMENT