बजाज उद्योग समूहाचे माजी अध्यक्ष आणि आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे ओळखले जाणारे ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांचं शनिवारी निधन झालं. राहुल बजाज यांच्या निधनानंतर त्यांनी अमित शाहांना केलेल्या प्रश्नांची चर्चा होऊ लागली आहे. राहुल बजाज यांनी एका पुरस्कार वितरण कार्यक्रमात भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचं नाव घेत देशातील वातावरणाचा आणि मॉब लिंचिंगचा मुद्दा उपस्थित केला होता.
ADVERTISEMENT
2019 मध्ये इकॉनॉमिक्स टाइम्सने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित होते. त्याचबरोबर केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन आणि पीयूष गोयलही यांच्यासह विविध उद्योग समूहांचे प्रमुखही उपस्थित होते. याच कार्यक्रमात राहुल बजाज यांनी अमित शाह यांना प्रश्न केला होता.
काय म्हणाले होते राहुल बजाज?
‘माझ्या उद्योगपती मित्रांपैकी कुणीही बोलणार नाही. मी खुलेपणाने ही गोष्ट बोलत आहे. एक वातावरण तयार करावं लागेल. जेव्हा युपीए-2चं सत्तेत होती, तेव्हा आम्ही कुणावरही टीका करू शकत होतो. आपण चांगलं काम करत आहात, तरीही आम्ही तुमच्यावर टीका करावी इतका आत्मविश्वास आमच्यामध्ये नाही; कारण तुम्हाला (सरकारला) ते आवडेल की नाही, हा विश्वासच आमच्या नाही.’
भाजपच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी नथुराम गोडसेचा उल्लेख देशभक्त म्हणून केला होता. राहुल बजाज यांनी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा उल्लेख करत शाहांना प्रश्न केला होता. ‘प्रज्ञा ठाकूर यांनी असंच विधान यापूर्वी केलं होतं, तेव्हा पंतप्रधान म्हणाले होते की, त्यांना माफ करणं अवघड आहे. पण त्यानंतर त्यानंतर त्यांना खासदार बनवण्यात आलं. देशात एक भीतीचं वातावरण तयार करण्यात आलं आहे. असहिष्णुतेचं वातावरण तयार झालं आहे. आम्हाला भीती वाटते. काही गोष्टी आम्ही बोलू इच्छित नाही, पण असं दिसतंय की यामध्ये आतापर्यंत कुणीही दोषीच सिद्ध झालेलं नाही’, असं राहुल बजाज म्हणाले होते.
स्पष्टवक्ता उद्योजक काळाच्या पडद्याआड! बजाज समुहाचे सर्वेसर्वा राहुल बजाज यांचं निधन
अमित शाह काय म्हणाले होते?
राहुल बजाज यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला अमित शाह यांनी उत्तर दिलं होतं. ‘तुम्ही विचारल्यानंतर मला असं वाटतं कुणाला वाटतं नसेल की घाबरत असेल. कुणीही कुणाला घाबरण्याची गरज नाही. जसं आपण म्हणता आहात की भीतीचं वातावरण तयार झालं आहे, तर वातावरण अधिक चांगला करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. मी स्पष्ट सांगू इच्छितो की, कुणीही घाबरण्याची गरज नाही आणि कुणीही घाबरवत नाहीये’, असं शाह म्हणाले होते.
प्रज्ञा ठाकूर यांच्याबद्दलच्या प्रश्नावर शाह म्हणाले होते की, ‘प्रज्ञा ठाकूर यांच्या विधानाची मी आणि राजनाथ सिंह यांनी लगेच निषेध केला होता. सरकार आणि भाजप अशा प्रकारच्या वक्तव्यांचं समर्थन करत नाही. आम्ही याचा तीव्र निषेधच करतो. त्याचं विधान नथुराम गोडसेबद्दल होतं की, उधम सिंह यांच्याबद्दल यावरून संभ्रम होता. मात्र, त्यांनी सभागृहात माफी मागितली’, असं शाहांनी सांगितलं होतं.
मॉब लिंचिंगच्या मुद्यावर शाह म्हणाले होते, ‘लिंचिंग पूर्वीही होत होतं. आजही होत आहे. कदाचित पूर्वीच्या तुलनेत कमी होत आहे. पण, कुणालाही दोषी सिद्ध करण्यात आलेलं नाही, हे चुकीचं आहे. लिंचिंगची अनेक प्रकरण सुरू आहेत. शिक्षाही झाल्या आहेत, पण माध्यमांमध्ये छापलं जात नाही,’ असं उत्तर शाह यांनी राहुल बजाज यांना दिलं होतं.
ADVERTISEMENT