मुंबईसह महाराष्ट्र भरात डिसेंबर महिना आहे की जून महिना हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. याचं कारण आहे आज सकाळपासून पावसाला झालेली सुरूवात. एवढंच नाही तर मुंबईसह महाराष्ट्रातल्या प्रमुख शहरांमध्ये पाऊस मुक्काम करणार आहे. पुढचे तीन ते चार तास वीजा चमकून मुंबईसह काही शहरांमध्ये पाऊस पडणार आहे.
ADVERTISEMENT
कोणत्या शहरांना देण्यात आला आहे पावसाचा अलर्ट?
मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये तीन ते चार तास पावसाचे असणार आहेत. तसंच पुणे, सातारा, नाशिक, नंदुरबार, धुळे, अहमदनगर या ठिकाणीही पाऊस पडणार आहे. मुंबई आणि इतर परिसराला आधीच बारा तास पाऊस पडेल असा इशारा देण्यात आला होता. त्यासोबतच आता या शहरांमध्येही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
अरबी समुद्र आणि लक्ष्यद्वीप बेटांचा समूह ते महाराष्ट्र किनारपट्टी यामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, आणि मराठवाडा या ठिकाणी जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होतो आहे. आज सकाळपासूनच राज्यातल्या बहुतांश ठिकाणी पावसाला सुरूवात झाली आहे. तर उपरोक्त ठिकाणी पुढचे तीन ते चार तास मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
बुधवारी संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत पुण्यात 16 मिमी, लोहगावमध्ये 16 मिमी, कोल्हापूर 2 मिमी, महाबळेश्वर 6 मिमी, नाशिक 19 मिमी, मुंबई 28 मिमी, सांताक्रूझ 29 मिमी, अलिबाग 22 मिमी, ठाणे 27 मिमी, औरंगबाद 2 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे.
लक्ष्यद्वीप बेट समूह ते उत्तर महाराष्ट्रापर्यंत निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे सध्या पाऊस पडतो आहे. 2 डिसेंबरलाही कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
3 डिसेंबरला रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठिकाणी मेघगर्जना, विजांचा गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, औरंगाबाद, बीड आणि उस्मानाबाद या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. विदर्भातली तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
ADVERTISEMENT