मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यात सुरु असलेल्या विविध वादांचा आणि मुद्द्यांचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘ठाकरे’शैलीत समाचार घेतला. यात राज्याबाहेर उद्योग गेल्याचे होणारे आरोप, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचं वक्तव्य, राहुल गांधी यांचं वीर सावरकर यांच्यावरील वक्तव्य, मंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर केलेली टीका या सर्व मुद्द्यावर त्यांनी भाष्य केलं. ते आज मुंबईतील गोरेगावमधल्या नेस्को मैदानावर गट अध्यक्षांच्या मेळाव्यात बोलत होते.
ADVERTISEMENT
राज्यपाल भगतसिंह कोश्यारींवर काय म्हणाले राज ठाकरे?
आमचं धोतरं बोललं, असं म्हणतं राज ठाकरे यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्यावर टीका केली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलच्या वक्तव्याचा समाचार घेताना ते म्हणाले, आपलं वय काय? बोलतोय काय, काय चाललयं? तुम्ही राज्यपाल पदावर बसलाय म्हणून मान राखतोय, अन्यथा महाराष्ट्रात शिव्यांची कमतरता नाही.
गुजराती आणि राजस्थानी समाज जर मुंबईतून निघून गेला तर या शहराची आर्थिक राजधानी ही ओळख पुसली जाईल असं वादग्रस्त वक्तव्य भगतसिंह कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं.
यावर बोलताना ठाकरे म्हणाले, कोश्यारीजी तुम्ही आधी गुजराती आणि मारवाड्यांना विचारा. तुम्ही तुमचं राज्य सोडून महाराष्ट्रात का आला? कारण सांगतो, पूर्वीपासून उद्योगधंद्यांसाठी महाराष्ट्रासारखी सुपिक जमीन नव्हती. हा महाराष्ट्राचा सुस्कंकृतपणा आहे. महाराष्ट्र कायम मोठा होता आणि मोठाच राहिलं. महाराष्ट्र काय आहे हे आम्हाला कोश्यारींकडून ऐकायचं नाही.
आता या सर्वांना सांगितलं तुम्ही तुमच्या राज्यात जावा तर जातील का? नाही. कारण महाराष्ट्रात असलेलं सभोवतालचं वातावरण आहे. आजही कोणत्याही उद्योजकाला प्रकल्प लावायचा असतो तेव्हा त्याचं पहिलं प्राधान्य महाराष्ट्र असतं, असंही राज ठाकरे यांनी सांगितलं.
उद्धव ठाकरेंवर काय म्हणाले राज ठाकरे?
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे कित्येक वर्ष म्हणतं होते, मशिदीवरचे भोंगे उतरवले गेले पाहिजे. इतकी वर्षे चालू असलेला हा प्रश्न आणि बाळासाहेब ठाकरेंनी अनेकवेळा बोलून दाखवलेली इच्छा आपण पूर्ण केली,
कोणतही काम न करणारे, फक्त हिंदुत्व हिंदुत्व करत बसणारे कुठे होते? मुख्यमंत्री पदावर असताना तब्येतीच कारण दिलं. पण एकनाथ शिंदेंनी रात्रीत कांडी फिरवली. आता फिरतायत सगळीकडे. स्वतःच्या स्वार्थासाठी दिसेल तो हात हातात धरायचा आणि बागेत कोपऱ्यात जाऊन बसायचं हे असले धंदे मी करत नाही.
मराठीच्या मुद्दावर असो किंवा हिंदुत्वाच्या मुद्दायावर असो. ही लोकं करणार काहीच नाही. उद्धव ठाकरेंच्या अंगावर एक तरी केस आहे का? नाहीच. कारण कधी भूमिकाच घेतली नाही. स्वतःच्या स्वार्थासाठी फक्त दिसेल तो हात हातात घ्यायचा आणि मला फक्त सत्तेत बसायचं म्हणायचं, असाही टोला राज ठाकरे यांनी लगावला.
शिंदे गटही राज ठाकरेंच्या निशाण्यावर :
मागील काही दिवसांपूर्वी शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरही ठाकरे यांनी भाष्य केलं. ते म्हणाले, हल्ली कोणीही येतं आणि काहीही बरळतं. हे राजकीय पक्षांचे प्रवक्ते काहीही बोलत असतात. कोणती भाषा असते ही? मी असा महाराष्ट्र कधीही बघितलेला नाही. एक राज्यामधील एक मंत्री एका महिला नेत्याला भिकारचोट म्हणतो. ते देखील टिव्हीवर? इथंपर्यंत खाली गेली का राजकीय पातळी?
काय काय प्रवक्ते हे बोनयासचं झाड असतात. दिसतात एवढेसे पण बोलतात एवढं. पण आपण कोण आहोत, आपली काय लायकी आहे? काय बोलतो? लोकांसमोर बोलत आहोत. आपल्या साधू संतांनी यासाठी महाराष्ट्रावर संस्कार केले का? जाती-पातीच विष कालविण्यासाठी संस्कार केले का? याच वातारणामुळे महाराष्ट्रातील मुलं शिक्षण-नोकरीसाठी बाहेर जात आहेत, असंही राज ठाकरे म्हणाले.
राहुल गांधींनाही सुनावलं :
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान वीर सावरकरांविषयी केलेल्या वक्तव्यावरुनही राज ठाकरे यांनी सुनावलं. ते म्हणाले, त्यादिवशी महाराष्ट्रात राहुल गांधी आले होते. गुळगुळीत डोक्याचं आहेत. हल्ली ते बोलतात की त्यांच्या मागून आर. डी. बर्मन बोलतात हेच कळत नाही.
गधड्या तुझी लायकी आहे का सावकरकरांविषयी बोलयची? माहिती तरी आहे का? त्यांना कुठे ठेवलं होतं? काय परिस्थितीमध्ये होते? दयेचा अर्ज आणि रणनीती नावाचा प्रकार असतो. त्याचा आम्ही कधीही विचार करणार नाही. ‘सर सलामत तो पगडी पचास’ असते. पन्नास वर्षांची शिक्षा झालेला माणूस आत सडत बसण्यापेक्षा म्हणतं असेल की, यांच्याशी खोटं बोलून बाहेर येतो आणि बाहेर आल्यावर पुन्हा हंगामा करतो आणि हे ज्याच्या डोक्यात चालू असेल त्याला रणनीती म्हणतात.
कृष्णनिती आजही सांगते की चांगल्या कामासाठी खोटं बोलावं लागलं तर बोलावं. मिर्झाराजे जयसिंग यांना जेव्हा महाराजांनी किल्ले दिले तेव्हा ती काय चितळेंची बर्फी होती का? पण ही रणनीती ज्याला समजत नाही तो गुळगुळीत मेंदुंचा, असा टोला त्यांनी राहुल गांधी यांना लगावला.
भाजपचाही समाचार :
राज ठाकरे पुढे म्हणाले, हे जसं काँग्रेसला सांगणं आहे, तसं भाजपलाही आहे. बस्स करा आता. दोन्ही बाजूंच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या लोकांची, जे महापुरुष म्हणून गणले गेले त्यांची बदनामी करुन काय हाती लागणार आहे? या देशासमोर जे प्रश्न उभे आहेत, यात नोकऱ्या उद्योग धंदे आरोग्याचे प्रश्न उभे आहेत. सुरक्षेचा प्रश्न उभा आहे, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. फक्त जर एकमेकांच्या दोषावर बोट ठेवतं राहिलो तर हाती काहीच लागणार नाही, असंही ते म्हणाले.
महाराष्ट्राबाहेर जाणाऱ्या उद्योगांवर राज ठाकरे काय म्हणाले?
महाराष्ट्रातील उद्योग धंदे बाहेर जात आहेत. काय चाललयं हे? २०१४ साली मी हेच म्हणतं होतो. २०१४ सालची माझी भाषण काढून बघा. नरेंद्र मोदी जर पंतप्रधान झाले तर त्यांनी सुरुवातीची पाच वर्ष केवळ उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड या राज्यांवर लक्ष केंद्रीत करावं. कारण तिथले लोक बाहेरच्या राज्यांत जाताता आणि स्थानिक लोकांना याचा त्रास होतो.
काही प्रकल्प गुजरातमध्ये जातात त्याचं वाईट वाटत नाही. आसाम, तमिळनाडूमध्ये जाऊ देत. तिथल्या तरुण तरुणींना रोजगार मिळू देत. काही वाईट वाटण्यासारखं नाही. प्रत्येक राज्यासोबत देश प्रगत होतो. पण मोदींनी केवळ गुजरात-गुजरात करु नये. या देशामधील प्रत्येक राज्य हे तुमचं अपत्य आहे, आणि या प्रत्येक अपत्याकडे तुम्ही समान पद्धतीने बघणं गरजेचं आहे, असंही राज ठाकरे यांनी सांगितलं.
ADVERTISEMENT