राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अंधेरी पोटनिवडणुकीसंदर्भात पत्र लिहिल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही एक पत्र पाठवलं आहे. राज ठाकरेंनी राज्यात परतीच्या पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीकडे मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधले आहे.
ADVERTISEMENT
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे. राज्यात परतीच्या पावसामुळे शेती आणि शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं असून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी राज यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्रात राज ठाकरे म्हणतात, “यावर्षी मान्सूनचा मुक्काम वाढला आहे आणि त्यात परतीच्या पावसाने कहर केला. या परतीच्या पावसाने पिकांचे अपरिमित नुकसान केलं आहे आणि एकूणच हवामान पाहता रब्बी हंगामबाबत शेतकरी बांधव चिंतातुर आहेत.”
देशात कुठेही अशी पद्धत नाही ! प्रभाग रचनेच्या निर्णयावरुन Raj Thackeray सरकारवर कडाडले
राज ठाकरे पुढे म्हणतात, “ऐन पीक काढणीच्या वेळी हा पाऊस आल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत पीक वाया गेलं आहे. यावर सरकारने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत, हे चांगलंच आहे. पण तेव्हढं पुरेसं नाही. सध्याची परिस्थिती पाहिली तर लक्षात येईल की शेतकऱ्यांचं राज्यभर झालेलं नुकसान इतकं मोठं आहे की राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा.”
“सरकारने पंचनाम्याचे आदेश दिलेले आहेत, पण पूर्वानुभव असा आहे की, सरकार पंचनाम्याचे आदेश देतं पण प्रशासकीय पातळीवर ते पंचनामे नीट होत नाहीत आणि गरजू शेतकरी नेहमीच उपेक्षित राहतो. त्यामुळे सरकारने हे पंचनामे नीट होतील हे पहावं आणि परिस्थितीचा युद्धपातळीवर आढावा घेऊन ओला दुष्काळ जाहीर करावा. तसंच कोरडवाहू आणि बागायती शेतीसाठी शेतकऱ्यांना जी प्रतिहेक्टरी नुकसान भरपाई दिली जाते ती पुरेशी नाही तिचा देखील पुनर्विचार करावा”, असंही ठाकरे यांनी म्हटलं आहे.
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात होईल, याकडे लक्ष द्यावं -राज ठाकरे
“दिवाळी हा आनंदाचा सण, म्हणून खरंतर लॉकडाऊनच्या संकटकाळानंतर शेतकरीही दिवाळी धूमधडाक्यात करण्याच्या मनस्थितीत असणार, अशा वेळी त्यांना दिलासा देऊन त्यांचीही दिवाळी अतिशय आनंदात साजरी होईल, याकडे राज्य सरकारनं कटाक्षानं लक्ष द्यावं, ही नम्र विनंती”, असं राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना लिहिलेल्या पत्रात म्हटलेलं आहे.
ADVERTISEMENT