मुंबई: औरंगाबादमध्ये आज (1 मे) मनसे प्रमुख राज ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. मात्र, ही सभा उधळून लावण्याची भूमिका भीम आर्मीने घेतली आहे. पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या 16 अटींचं उल्लंघन राज ठाकरे यांनी केलं तर महापुरुषांच्या नावाने घोषणा देऊन सभा बंद पाडण्याचा इशारा भीम आर्मीने दिला होता.
ADVERTISEMENT
आज राज्यभरातून भीम आर्मीचे कार्यकर्ते औरंगाबादला दाखल होत असून राज ठाकरेंना भारतीय संविधान भेट देणार असल्याचं भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी म्हटलं होतं.
भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
औरंगाबाद येथील राज ठाकरेंची सभा उधळून लावण्याचा इशारा भीम आर्मीने दिला होता, मात्र त्याअगोदरच मुंबई पोलिसांनी भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. मुंबईहून औरंगाबादच्या दिशेने निघालेले भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना घाटकोपर चिरागनगर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
औरंगाबादच्या सभेत राज ठाकरे आज काय बोलणार?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची चर्चेतील सभा आज होत आहे. औरंगाबाद येथील सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या मैदानावर ही सभा होत असून, मनसेकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे.
मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून हनुमान चालीसा वाजण्याच्या राज ठाकरे यांच्या भूमिकेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी झालेल्या मनसेच्या मेळाव्यात ही भोंगे उतरवण्याची मागणी केली होती.
राज ठाकरे यांनी मुंबईनंतर ठाण्यात सभा घेतली होती. ज्यात भोंगे उतरवण्यासाठी 3 मे पर्यंतचा अल्टिमेटम दिलेला आहे. या अल्टिमेटला आता 2 दिवसच शिल्लक असून, त्यापार्श्वभूमीवर राज ठाकरे यांची औरंगाबादेत सभा होत आहे.
त्यामुळे या सभेत राज ठाकरे भोंग्यांच्या मुद्द्यावर बोलणार की मूळची शिवसेनेची मागणी असलेल्या औरंगाबादचं संभाजीनगर करण्याच्या नामांतर करण्याचा मुद्दा उचलणार हे पाहावं लागणार आहे.
मशिदींवरील भोंग्याचा मुद्दा अजेंड्यावर घेतल्यानंतर राज ठाकरे हे हिंदुत्वाच्या बाजूने झुकल्याची चर्चा केली जात आहे. औरंगाबादच्या सभेला जाण्यापूर्वी राज ठाकरे यांनी पुरोहितांचे आशीर्वाद घेतले होते. त्याचबरोबर वढू बुद्रूक येथे जाऊन छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचं दर्शनही त्यांनी घेतलं. त्यातून त्यांनी संभाजीनगर आणि हिंदूत्व या दोन्ही गोष्टी अधोरेखित करण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जात आहे.
Loudspeaker Controversy : जमलेल्या माझ्या तमाम… ‘त्या’ मैदानावर होणार ‘राज’गर्जना
राज ठाकरे यांच्या सभेसाठी औरंगाबाद येथील राज्य राखीव पोलीस दलाच्या ३ कंपन्या, जालना येथील राज्य राखीव पोलीस दलाच्या ३ कंपन्यांना पाचारण करण्यात आलेलं आहे. जालना-औरंगाबाद राज्य राखीव सुरक्षा दल कॅम्पमधील एकूण ६०० जवान आणि शहर पोलीस दलातील ११०० कर्मचारी आणि सर्व अधिकारी मिळून १९२५ पोलिसांचा सभेसाठी बंदोबस्त करण्यात आलेला आहे.
ADVERTISEMENT